मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवण्यात आलेल्या अखेरच्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने विंडीजवर ६७ धावांनी मात केली. या विजयासह भारताने ३ वन-डे सामन्यांची मालिका २-१ च्या फरकाने जिंकली. रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांनी विंडीडच्या गोलंदाजांची पिसं काढत २४० धावांपर्यंत मजल मारली. या सामन्याअखेरीस कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार रोहित शर्मा यांच्यातली बहुचर्चित शर्यत अखेरीस बरोबरीत सुटली आहे.
अवश्य वाचा – IND vs WI : रोहितची विक्रमी अर्धशतकी खेळी, केली कोणालाही न जमलेली कामगिरी
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज म्हणून गेल्या काही सामन्यांमध्ये रोहित आणि विराटमध्ये चढाओढ सुरु होती. काही सामन्यांनतर विराट तर काही सामन्यांनतर रोहित शर्मा या यादीत आघाडीवर असायचा. २०१९ वर्षातली भारतीय संघाची अखेरची टी-२० मालिका आता संपली आहे. विंडीजविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यापर्यंत रोहित शर्मा या शर्यतीत पिछाडीवर पडला होता. मात्र घरच्या मैदानावर खेळताना रोहित शर्माने आक्रमक ७१ धावांची खेळी करत विराटला मागे टाकलं. मात्र विराट कोहलीनेही चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना २९ चेंडूत नाबाद ७० धावा करत रोहितशी बरोबरी केली.
रोहित शर्माने घरच्या मैदानावर खेळताना ३४ चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकारांच्या सहाय्याने ७१ धावा केल्या. टी-२० मालिकेत बाजी मारल्यानंतर भारतीय संघ आता वन-डे मालिकेसाठी सज्ज झाला आहे. १५ तारखेला पहिला वन-डे सामना खेळवला जाणार आहे.