ICC Cricket World Cup 2023, England vs New Zealand: एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेतील पहिल्या सामन्यात गतविजेते इंग्लंड आणि न्यूझीलंड आमनेसामने आले होते. या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडवर ९ विकेट्सने मोठा विजय नोंदवला. या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्रने चांगली फलंदाजी केली आणि त्याने केवळ त्याच्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील पहिले शतकच झळकावले नाही, तर एकदिवसीय विश्वचषकाच्या पदार्पणात सामन्यात शतक झळकावण्यातही यश मिळवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सामन्याद्वारे रचिन रवींद्रने एकदिवसीय विश्वचषकात पदार्पण केले आणि या सामन्यात न्यूझीलंड संघासाठी उत्कृष्ट खेळी खेळली. एकदिवसीय विश्वचषकातील पदार्पणाच्या सामन्यात रचिन रवींद्रने शतक झळकावले आणि विराट कोहलीची बरोबरी केली. भारताकडून विराट कोहलीने २०११ सालीही अशीच कामगिरी केली होती. कोहलीने बांगलादेशविरुद्धच्या वनडे विश्वचषक पदार्पणाच्या सामन्यात नाबाद शतक झळकावले होते.

रचिन रवींद्रने इंग्लंडविरुद्ध अतिशय आक्रमक खेळी खेळली. त्याने या सामन्यात २६ चेंडूत षटकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. यादरम्यान रचिनच्या बॅटमधून ३ षटकार आणि ७ चौकार आले. आपले अर्धशतक पूर्ण केल्यानंतर रचिनने ८२ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने आपल्या शतकी खेळीदरम्यान ४ षटकार आणि ९ चौकार लगावले. त्याचबरोबर त्याने ९६ चेंडूत ११ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने नाबाद १२३ धावांची खेळी केली

हेही वाचा – World Cup 2023: इंग्लंडच्या संघाने केला विश्वविक्रम! वनडे क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यादाच झाली ‘या’ खास पराक्रमाची नोंद

न्यूझीलंडसाठी विश्वचषकात शतक झळकावणारा रचिन हा सर्वात तरुण फलंदाज ठरला –

रचिन रवींद्र आता एकदिवसीय विश्वचषकात न्यूझीलंडकडून शतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. त्याने अवघ्या २३ वर्षे ३२१ दिवसांच्या वयात इंग्लंडविरुद्ध वनडे विश्वचषकातील पहिले शतक झळकावले. त्याने नॅथन अॅस्टलचा विक्रम मोडला. नॅथन अॅस्टलने २४ वर्षे १५२ दिवसांच्या वयात शतक झळकावले होते.

रचिन रवींद्र भारताशी आहे खास कनेक्शन –

https://x.com/RCBTweets/status/1709944483029393571?s=20

न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्र भारतीय वंशाचा असून त्याची ‘रचीन’ या नावाची गोष्ट अनोखी आहे. भारताचे माजी कर्णधार आणि भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नावातील ‘र’ आणि मास्टरब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकर यांच्या नावातील ‘चिन’ असं एकत्र करुन ‘रचीन’ हे नाव ठेवण्यात आलं आहे. रवींद्रचे बाबा रवी कृष्णमूर्ती हे बंगळुरूचे असून ते नव्वदीच्या दशकात न्यूझीलंडला रवाना झाले. न्यूझीलंडमध्ये ते हट हॉक्स क्लब चालवतात. या क्लबतर्फे भारतात दरवर्षी काही खेळाडू येतात. हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई अशा विविध भारतीय शहरांमध्ये खेळण्याचा सराव व्हावा म्हणून हे खेळाडू येत असतात. रवींद्र २०११ पासून सातत्याने भारतात येतो आहे.

हेही वाचा – World Cup 2023: बाबर आझमने सांगितली पाकिस्तान संघाची सर्वात मोठी ताकद; भारतातील दबावाबाबत म्हणाला, ‘आमच्यावर..’

रचिन आणि कॉनवे यांच्यातील विक्रमी भागीदारी –

रचिन रवींद्र आणि डेव्हन कॉनवे यांच्यातील या सामन्यात आतापर्यंत दुसऱ्या विकेटसाठी २७३*धावांची भागीदारी झाली. या दोघांनी विश्वचषकात न्यूझीलंडसाठी कोणत्याही विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम केला आहे. या दोघांनी मिळून ली जर्मेन आणि ख्रिस हॅरिस यांचा २७ वर्ष जुना विक्रम मोडला.

विश्वचषकात न्यूझीलंडसाठी सर्वोच्च भागीदारी (कोणत्याही विकेटसाठी)

२७३*धावा – डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र विरुद्ध इंग्लंड, अहमदाबाद, २०२३
१६८ धावा – ली जर्मेन आणि ख्रिस हॅरिस विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई, १९९६
१६६*धावा – ब्रेंडन मॅक्युलम आणि मार्टिन गुप्टिल विरुद्ध झिम्बाब्वे, अहमदाबाद, २०११
१६० धावा – केन विल्यमसन आणि रॉस टेलर विरुद्ध वेस्ट इंडिज, मँचेस्टर, २०१९
१४९ धावा – ग्लेन टर्नर आणि जॉन पार्कर विरुद्ध पूर्व आफ्रिका, बर्मिंगहॅम, १९७५

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rachin ravindra became the youngest batsman to score a century on odi world cup 2023 debut match vbm
Show comments