Rachin Ravindra broke Sachin Tendulkar’s record for most runs in ODI World Cup: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेत न्यूझीलंडसाठी सर्वात मोठा खेळाडू ठरलेला रचिन रवींद्र आज एका विक्रमाच्या बाबतीत मास्टर ब्लास्टरला सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. २३ वर्षीय रचिन रवींद्रने सचिन तेंडुलकरचा २७ वर्ष जुना विक्रम मोडला आहे. आज त्याने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात एक धाव काढताच, त्याने एक विशेष विक्रम आपल्या नावावर केला आहे. २५ वर्षापेक्षा कमी वयाच्या खेळाडूने विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा हा विक्रम आहे. सध्या हा विक्रम त्याने सचिन तेंडुलकरला मागे टाकत आपल्या नावावर केला आहे.
सचिन तेंडुलकरने १९९६ च्या विश्वचषकात वयाच्या २५ वर्षापूर्वीच एका विश्वचषकात ५२३ धावा केल्या होत्या. त्यांचा हा विक्रम फार काळ कोणीही मोडू शकले नव्हते. मात्र रचिन रवींद्रने गेल्या सामन्यात या विक्रमाची बरोबरी केली होती. २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत त्याने आतापर्यंत ५२३ धावा केल्या आहेत. आजच्या सामन्यात त्याने एक धाव सचिनला मागे टाकले आहे. ५ षटकानंतर न्यूझीलंड संघाने बिनबाद ४० धावा केल्या आहेत. त्याचबरोबर डेव्हान कॉनवे २४ आणि रचिन रवींद्र १७ धावांवर खेळत आहे.
रचिन रवींद्रच्या नावामागील कथा –
असे म्हणतात की, रचिन रवींद्रचे आई-वडील क्रिकेटचे चाहते होते. त्यांना सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड खूप आवडायचे. त्यामुळेच या दोन दिग्गज फलंदाजांची नावे एकत्र करून त्यांनी आपल्या मुलाचे नाव निर्माण केले. आता रचिननेही आपले नाव सिद्ध केले आहे. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडची झलक त्याच्या फलंदाजीतही दिसते.
विश्वचषकात रचिन रवींद्रची शानदार फलंदाजी –
विश्वचषक २०२३ मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रचिन रवींद्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत ५२३ धावा केल्या आहेत. तो अव्वल क्विंटन डी कॉकपेक्षा फक्त २७ धावांनी मागे आहे. रचिनने या स्पर्धेतही तीन शतके झळकावली आहेत. तो ७४.७१ च्या फलंदाजीची सरासरी आणि १०७.३९च्या स्ट्राईक रेटने धावा करत आहे. या विश्वचषकात तो न्यूझीलंडसाठी ट्रम्प कार्ड असल्याचे सिद्ध झाले आहे.
न्यूझीलंडचा संघ उपांत्य फेरीत करू शकतो प्रवेश –
आज न्यूझीलंडला विश्वचषक २०२३ च्या उपांत्य फेरीत पोहोचण्याचा दावा मजबूत करण्याची संधी आहे. आज त्याचा सामना बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर श्रीलंकेशी होत आहे. श्रीलंकेचा संघ विश्वचषकात उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. पण हा सामना जिंकून २०२५ मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरू शकतो.
न्यूझीलंडला विजयासाठी १७२ धावांचे लक्ष्य –
प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ ४६.४ षटकांत सर्वबाद १७१ धावांवर आटोपला. कुसल परेराने सर्वाधिक ५१ धावा केल्या. तिक्षीनाने नाबाद ३८ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. न्यूझीलंड संघ 172 धावांचे लक्ष्य सहज गाठण्याचा प्रयत्न करेल आणि उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास निश्चित करेल.