नवी दिल्ली : वानखेडे स्टेडियमवर भारताविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळण्याचे स्वप्न होते. ते आता सत्यात उतरणार आहे. या तगडय़ा लढतीसाठी आम्ही सज्ज आहोत. एक चांगला सामना बघायला मिळेल, असा विश्वास न्यूझीलंडचा नवोदित खेळाडू रचिन रवींद्रने व्यक्त केला.
रचिनने स्पर्धेत आतापर्यंत तीन शतके झळकावली आहेत. स्पर्धेत सर्वोत्तम धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो क्विंटन डीकॉकनंतर तिसऱ्या स्थानावर आहे. ‘‘वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला आहे. स्टेडियम पूर्णपणे भरलेले असेल आणि सगळे प्रेक्षक भारतीयांच्या बाजूने असतील. यानंतरही आम्ही आमचे आव्हान राखण्याचा प्रयत्न करू,’’ असे रचिन म्हणाला.
‘‘सामन्यामध्ये जय-पराजय हा असतोच. कोण तरी एकच संघ जिंकणार असतो. तुम्ही प्रत्येक वेळेस जिंकू शकणार नाही. सामन्याच्या दिवशी तुमचा खेळ कसा होतो, त्यावर बरेच काही अवलंबून असते. त्यामुळे आमचा खेळ त्या दिवशी कसा होतो यावर बरेच काही अवलंबून असेल,’’ असेही रचिनने सांगितले. रचिनने स्पर्धेत आतापर्यंत ५६५ धावा केल्या आहेत.
‘‘वानखेडेवर भारताविरुद्ध खेळताना आम्ही गेल्या दोन विश्वचषक स्पर्धा आठवतो. आम्ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्नवर खेळलो, लॉर्डसवर इंग्लंडविरुद्ध खेळलो आणि आता वानखेडेवर भारताविरुद्ध खेळणार आहोत. ऑस्ट्रेलियाकडून आम्ही अंतिम फेरीत पराभूत झालो. २०१९ मध्ये लॉर्डसवर पुन्हा तेच घडले, आम्ही इंग्लंडविरुद्ध हरलो. यावेळी आम्ही हे चित्र बदलण्याच्या जिद्दीने उतरत आहोत. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या संघाकडून हरण्याचा इतिहास आम्हाला बदलायचा आहे. आमच्यासाठी हा विशेष महत्त्वपूर्ण सामना आहे,’’ असेही रचिन म्हणाला.
‘‘मैदानावर जेव्हा तुमच्या नावाचा गजर होतो, तेव्हा वेगळे स्फुरण चढते. मैदानावर आपल्या नावाचा गजर व्हायला हवा हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. असे क्षण येतात तेव्हा खेळण्याचा उत्साह वाढतो आणि एक सुरेख खेळी खेळली जाते,’’ असे रचिनने सांगितले.
न्यूझीलंड संघात चांगले खेळाडू आहे. प्रत्येक खेळाडू आपल्या गुणवत्तेला न्याय देत आहे. त्यामुळेच खेळाडूंच्या दुखापतींचा प्रश्न समोर येऊनही न्यूझीलंड संघ त्यावर मात करून उपांत्य फेरीत पोहोचला आहे. संघात असलेल्या खेळाडूंच्या चांगल्या पर्यायांमुळे न्यूझीलंड संघ या उपांत्य फेरीपर्यंतच्या प्रवासाचा आनंद घेत आहे, असे रचिन म्हणाला.