Rachin Ravindra at BAN vs NZ Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात २४ फेब्रुवारीला पाकिस्तानमधील रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर सामना खेळवण्यात आला. या सामन्यातील किवी संघाच्या विजयासह भारत आणि न्यूझीलंडचा संघ अधिकृतपणे सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. तर पाकिस्तान आणि बांगलादेशचा संघ स्पर्धेत बाहेर पडला. न्यूझीलंड-बांगलादेश यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात खेळाडूंच्या सुरक्षेबाबत मोठी त्रुटी दिसून आली. किवी संघ फलंदाजी करत असताना रचिन रवींद्रला भेटण्यासाठी चाहता मैदानात घुसला.

न्यूझीलंडचा संघ या सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करत असताना, त्याचवेळी हातात पोस्टर घेऊन एक प्रेक्षक अचानक खेळपट्टीवर पोहोचला. या विचित्र घटनेनंतर मैदानावर उपस्थित सर्व खेळाडू थोडे दचकले असतानाच पाकिस्तानमधील खेळाडूंच्या सुरक्षेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

बांगलादेशने या सामन्यात न्यूझीलंड संघाला २३७ धावांचे लक्ष्य दिले होते, ज्यात १५ धावांवर २ विकेट गमावल्या. यानंतर रचिन रवींद्रने एका टोकाकडून डाव सांभाळून संघाला विजयाकडे नेण्याची जबाबदारी घेतली. दरम्यान, रचिन फलंदाजी करत असताना, एक प्रेक्षक हातात पोस्टर घेऊन मैदानात घुसला आणि थेट खेळपट्टीच्या दिशेने धाव घेतल्यानंतर तो हात वर करून हवेत पोस्टर दाखवत होता आणि रचिन रवींद्रला जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला. रचिनच्या अक्षरश: गळ्यात पडल्याने रचिनला त्रास होत असल्याचेही दिसले.

या घटनेने रवींद्र थोडा घाबरला, तर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी नंतर त्या चाहत्याला मैदानाबाहेर काढले. आता या घटनेमुळे बऱ्याच दिवसांनी पाकिस्तानात होत असलेल्या आयसीसी स्पर्धेतील खेळाडूंच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अ गटातील सामना किवी संघाने ५ गडी राखून जिंकला आणि उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. न्यूझीलंडच्या या विजयात रचिन रवींद्रने महत्त्वाची भूमिका बजावली ज्यात त्याने १०५ चेंडूत ११२ धावांचे शानदार शतक झळकावले, या शतकासह त्याने एक विश्वविक्रमही आपल्या नावे केला आहे. याशिवाय टॉम लॅथमनेही ५५ धावांची खेळी केली.

न्यूझीलंडच्या विजयानंतर पाकिस्तान आणि बांगलादेश हे दोन्ही संघ उपांत्य फेरी गाठण्याच्या शर्यतीतून बाहेर पडले होते. न्यूझीलंडशिवाय भारत हा उपांत्य फेरीत पोहोचणारा अ गटातील दुसरा संघ आहे. तर आता ब गटातील कोणते दोन संघ सेमीफायनससाठी पात्र ठरणार यावर सर्वांच्या नजरा आहेत.

Story img Loader