Rachin Ravindra Century with World Record: न्यूझीलंड संघाचा स्टार फलंदाज रचिन रवींद्रने दुखापतीतून शानदार पुनरागमन करत चॅम्पियन्स ट्रॉफीमधील पहिल्याच सामन्यात धुमाकूळ घातला. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये रचिन रवींद्रने बांगलादेशविरुद्ध शानदार शतक झळकावून रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव नोंदवले. आयसीसी स्पर्धेपूर्वी लाहोरमध्ये झालेल्या तिरंगी मालिकेच्या पहिल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दुखापतीमुळे न्यूझीलंडच्या शेवटच्या तीन सामन्यांमधून तो बाहेर पडला होता. पण त्याने दणक्यात पुनरागमन करत वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला.

चॅम्पियन्स ट्रॉफीतील बांगलादेशविरूद्ध सामन्यात आजारपणामुळे बाहेर पडलेल्या डॅरिल मिचेलच्या जागी रचिनने प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवले. न्यूझीलंडने धावांचा पाठलाग करताना खराब सुरुवात केल्यानंतर २५ वर्षीय रचिन चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने डेव्हॉन कॉन्वेच्या मदतीने संघाचा डाव सावरला.

डेव्हॉन कॉन्वेसह तिसऱ्या विकेटसाठी ५७ धावांची भक्कम भागीदारी करून रचिनने न्यूझीलंडला लक्ष्य गाठण्यास मदत केली. नंतर टॉम लॅथम आणि रचिन यांनी चौथ्या विकेटसाठी १२९ धावांची भागीदारी केली. दरम्यान रचिन अवघ्या १०५ चेंडूत ११२ धावा करून बाद झाला, तर लॅथमने ७६ चेंडूत ५५ धावा करून संघासाठी सहज विजयाचा टप्पा निश्चित केला. या विजयासह न्यूझीलंडने भारतासह उपांत्य फेरीत प्रवेश केला.

चॅम्पियन्स ट्रॉफीत शतक झळकावत रचिन रवींद्रने घडवला इतिहास

रवींद्रच्या शतकाने त्याने आपलं नाव इतिहासाच्या पुस्तकात नोंदवले. क्रिकेट विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या दोन्ही सामन्यांमध्ये पदार्पणात शतक झळकावणारा तो इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे. या युवा खेळाडूने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर २०२३ विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध शतक झळकावले होते. यानंतर आता चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्या सामन्यात त्याने शतक झळकावत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली.

क्रिकेटच्या इतिहासात, १९ खेळाडूंनी एकदिवसीय विश्वचषकात पदार्पणात शतक झळकावले आहे आणि १५ खेळाडूंनी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पदार्पणातच शतक केले आहे. पण पदार्पणात शतक झळकावणारा रचिन हा दोन्ही यादीतील जगातील एकमेव खेळाडू आहे.

एकदिवसीय क्रिकेटमधील अवघ्या ३० डावांमध्ये रचिनचे हे चौथे शतक होते आणि चारही शतके आयसीसी स्पर्धांमध्ये त्याने केली आहेत. या स्टार फलंदाजाने २०२३ च्या क्रिकेट विश्वचषकात तीन शतकं झळकावली. रचिन आता आयसीसी स्पर्धांमध्ये न्यूझीलंडकडून सर्वाधिक शतकं करणारा खेळाडू बनला आहे. त्याच्याआधी केन विल्यमसन आणि नॅथन ॲस्टल यांनी प्रत्येकी तीन शतकं झळकावली होती. आयसीसी स्पर्धेच्या इतिहासात सर्वात जलद चार शतकं करणारा रचिन हा भारताच्या शिखर धवननंतरचा दुसरा खेळाडू आहे.

Story img Loader