Rachin Ravindra’s father Ravi Krishnamurthy clarifies his son Name: एकदिवसीय विश्वचषक २०२३च्या स्पर्धेत न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्रने फलंदाजीत शानदार कामगिरी केली आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रचिन रवींद्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. रचिन रवींद्रने आतापर्यंत ९ सामन्यात ७०.६२ च्या सरासरीने ५६५ धावा केल्या आहेत. अशात रचिन रवींद्रचे नाव चर्चेचा विषय ठरत आहे. आतापर्यंत असे बोलले जात होते की, त्यांच्या वडिलांनी रचिन रवींद्र हे नाव माजी भारतीय दिग्गज राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांच्या नावावर ठेवले आहे. मात्र आता रचिन रवींद्रच्या वडिलांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
रवी कृष्णमूर्तींचा रचिन नावाबद्दल खुलासा –
रचिनचे वडील रवी कृष्णमूर्ती यांनी ‘द प्रिंट’शी बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले, “जेव्हा रचिनचा जन्म झाला, तेव्हा माझ्या पत्नीने रचिन हे नाव सुचवले. त्यानंतर आम्ही या नावावर फारशी चर्चा केली नाही. हे नाव छान वाटलं. त्याचे स्पेलिंग सोपे होते आणि ते लहानही होते, त्यामुळे नाव तेच ठेवणे आम्हाला योग्य वाटले.”
रवी कृष्णमूर्ती पुढे म्हणाल, “काही वर्षांनी आम्हाला समजले की हे नाव राहुल आणि सचिनच्या नावांचे मिश्रण आहे. परंतु आम्ही त्याचे नाव जाणूनबुजून रचिन ठेवले नाही. कारण आम्हाला आमच्या मुलाला क्रिकेटर बनवायचे आहे, असे काही नव्हते.” दरम्यान, काही दिवसांपूर्वी श्रीलंकेविरुद्ध दणदणीत विजय मिळवल्यामुळे न्यूझीलंडचं सेमीफायनलमधलं स्थान जवळपास निश्चित झालं होतं. न्यूझीलंडच्या विजयानंतर रचिन रविंद्र बंगळुरूमधील आपल्या आजोळी गेला होता. यावेळी त्याच्या आजीने त्याची दृष्ट काढल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.
रचिन रवींद्रची ही क्रिकेट कारकीर्द –
रचिन रवींद्रच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे, तर ३ कसोटी सामन्यांव्यतिरिक्त या खेळाडूने २१ एकदिवसीय आणि १८ टी-२० सामन्यांमध्ये न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले आहे. रचिन रवींद्रने ३ कसोटी सामन्यांमध्ये २९.६७ च्या स्ट्राइक रेटने आणि १४.६ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. रचिन रवींद्रने २१ एकदिवसीय सामन्यांमध्ये १०९.२८ च्या स्ट्राइक रेटने आणि ४७.१२ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने १८ टी-२० सामन्यांमध्ये ११७.८९ च्या स्ट्राइक रेटने आणि १३.१८ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. पण या खेळाडूला विश्वचक २०२३ मधून खरी ओळख मिळाली. रचिन रवींद्र या विश्वचषकात किवी संघासाठी खूप धावा करत आहे. गरज पडेल तेव्हा गोलंदाजीतही महत्त्वाचे योगदान देत आहे.