अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा

राफेल नदालने इटलीच्या मॅट्टेओ बेरेट्टिनीचा सरळ सेटमध्ये पाडाव करत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. १९व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाच्या उंबरठय़ावर असलेल्या स्पेनच्या नदालला आता अंतिम फेरीत रशियाच्या पाचव्या मानांकित डॅनिल मेदवेदेवशी झुंज द्यावी लागेल.

नोव्हाक जोकोव्हिच आणि रॉजर फेडरर या मातब्बर टेनिसपटूंचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर नदालकडे संभाव्य विजेता म्हणून पाहिले जात आहे. ३३ वर्षीय नदालनेही उपांत्य फेरीत २४व्या मानांकित बेरेट्टिनीला ७-६ (८/६), ६-४, ६-१ असे नमवून जेतेपदाकडे कूच केली आहे. मेदवेदेवनेही बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्हचा  ७-६ (७/५), ६-४, ६-३ असा धुव्वा उडवून अंतिम फेरी गाठली आहे.

नदालने मोसमाच्या सुरुवातीलाच फ्रेंच खुल्या स्पर्धेचे १२वे विजेतेपद मिळवल्यानंतर त्याला दुखापतीला सामोरे जावे लागले होते. मात्र आता चौथ्या अमेरिकन विजेतेपदासाठी तो सज्ज झाला आहे. नदाल व मेदवेदेव फक्त एकदाच एकमेकांशी भिडले आहेत. गेल्या महिन्यात माँट्रियल स्पर्धेच्या अंतिम फेरीत नदालने मेदवेदेवचा ६-३, ६-० असा धुव्वा उडवला होता. मेदवेदेवने गेल्या सहा आठवडय़ांत फक्त दोन पराभव पत्करत २० विजयांची नोंद केली आहे. सिनसिनाटी स्पर्धा जिंकणाऱ्या मेदवेदेवला वॉशिंग्टन आणि कॅनडा स्पर्धेत उपविजेतेपद मिळाले होते.

उपांत्य फेरीच्या प्रवासापर्यंत फक्त एक सेट गमवावा लागलेल्या नदालला बेरेट्टिनीने कडवी लढत दिली. पहिला सेट टायब्रेकरमध्ये गेल्यानंतर बेरेट्टिनीने ४-० अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर ६-४ अशी आघाडी घेत दोन सेटपॉइंट मिळवले होते. मात्र नदालने ८-६ अशा फरकाने बाजी मारत पहिला सेट जिंकला. बेरेट्टिनीची सर्व्हिस भेदून नदालने ४-३ अशी आघाडी घेतली. त्यानंतर दोन्ही वेळा आपली सर्व्हिस राखत त्याने दुसरा सेटही नावावर केला. तिसऱ्या सेटमध्ये बेरेट्टिनीला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. सहजपणे हा सेट जिंकून नदालने आगेकूच केली.

मेदवेदेवलाही दिमित्रोव्हविरुद्ध पहिल्या सेटसाठी संघर्ष करावा लागला. पहिला सेट टायब्रेकरमध्ये जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटच्या सुरुवातीलाच दिमित्रोव्हची सर्व्हिस भेदून मेदवेदेवने ३-१ अशी आघाडी घेतली होती. ६-४ अशा फरकाने दुसरा सेट जिंकल्यानंतर त्याने दिमित्रोव्हला सामन्यात पुनरागमन करण्याची संधीच दिली नाही.

२७ राफेल नदालने ग्रँडस्लॅम स्पर्धाच्या अंतिम फेरीत २७ वेळा मजल मारली आहे. यापैकी १८ वेळा त्याने विजेतेपद, तर ८ वेळा उपविजेतेपद मिळवले आहे.

१ ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणारा डॅनिल मेदवेदेव हा २००५नंतरचा रशियाचा पहिला पुरुष टेनिसपटू ठरला आहे. याआधी मराट सॅफिनने ऑस्ट्रेलियन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.

अमेरिकन स्पर्धेची अंतिम फेरी गाठल्याने अतिशय आनंद झाला आहे. या मोसमात अनेक खडतर प्रसंगांना मला सामोरे जावे लागले. त्यानंतर इथपर्यंत वाटचाल करत मी बरेच काही साध्य केले आहे. रविवारी ग्रँडस्लॅम विजेतेपदाची आणखी एक संधी मिळणार आहे. आता अंतिम लढतीसाठी कसून सराव करून रविवारी सर्वोत्तम खेळ करण्याचा माझा प्रयत्न असेल. मेदवेदेव प्रत्येक आठवडय़ागणिक आपल्या कामगिरीत सुधारणा करत असून त्याला हरवणे सोपे नसेल.

– राफेल नदाल

सामन्याची वेळ : रविवारी मध्यरात्री १.३० वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट २

Story img Loader