माती हा त्याचा खास जिव्हाळ्याचा विषय. मातीच्या कोर्टावर त्याची कामगिरी निव्वळ अचंबित करणारी. दिनदर्शिकेत मे महिना जवळ येऊ लागतो तसे त्याचे मातीवरचे वर्चस्व सिद्ध होऊ लागते. लाल मातीवर रंगणाऱ्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत जेतेपदावरील त्याची मक्तेदारी रोखणे कठीण आहे. राफेल नदाल आणि माती हे समीकरण घट्ट असल्याचे हे लक्षण. परंतु यंदा काही वेगळेच घडते आहे. जागतिक क्रमवारीत नदाल अव्वल स्थानी आहे. फ्रेंच खुली स्पर्धा याच महिन्यात होणार आहे. मात्र या स्पर्धेची रंगीत तालीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्पर्धामध्ये नदालला झटपट गाशा गुंडाळावा लागला आहे. मातीच्या कोर्टावरील झालेल्या स्पर्धामधील नदालची घसरण त्याला आणि त्याच्या चाहत्यांनाही अस्वस्थ करणारी आहे. या स्पर्धातील कामगिरी बाजूला ठेऊन नव्या तडफेने आणि ऊर्जेने तो परतेल, असा विश्वास त्याच्या चाहत्यांना आहे. मात्र त्याचवेळी या स्पर्धातील पराभवामुळे नदालला मातीच्या मैदानावर हरवता येऊ शकते, हा आत्मविश्वास त्याच्या प्रतिस्पध्र्याना मिळाला आहे.
माँटे कालरे स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत त्याचा जिवलग मित्र डेव्हिड फेररने त्याला नमवले तर बार्सिलोना स्पर्धेत स्पेनच्याच निकोलस अल्माग्रोने त्याच्यावर विजय मिळवला होता. विशेष म्हणजे अल्माग्रोविरुद्धच्या आधीच्या दहाही लढतींमध्ये त्याने निर्विवाद वर्चस्व गाजवले होते. बार्सिलोना स्पर्धेत २००३नंतर नदाल हरलेला नाही.
४१ लढतीतील त्याचा विजयरथ अचानकच रोखला गेला. विक्रमी आठ वेळा फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा करणाऱ्या नदालने २५ महिने आणि ८१ लढतींमध्ये अपराजित राहण्याची किमयाही साधली होती. पण यंदा काहीतरी वेगळे घडताना दिसते आहे.
या घसरणीमागे नदालला झालेल्या दुखापती हे प्रमुख कारण आहे. गुडघ्याच्या गंभीर दुखापतीमुळे नदालला २०१३मध्ये बहुतांशी काळ खेळता आले नव्हते. या दुखापतीतून तो सावरलाय असे वाटत असतानाच आता उजव्या कोपऱ्याला झालेल्या दुखापतीने तो त्रस्त आहे.
मात्र या घसरणीने नदालच्या फ्रेंच खुल्या स्पर्धेसाठीच्या तयारीवर कोणताही परिणाम झालेला नाही. ‘‘टेनिस हा खेळ सातत्याने कसोटी पाहणारा खेळ आहे. मी आयुष्यभर सातत्याने जिंकू शकत नाही. मातीच्या कोर्टवर मला आठ दिवसांत दोनदा पराभवाला सामोरे जावे लागले. माझ्याबाबतीत हे गेल्या अनेक वर्षांत घडलेले नाही. मात्र यात काळजी करण्यासारखे काही नाही. फ्रेंच खुल्या स्पर्धेसाठी मी कसून तयारी करत आहे आणि माझी कामगिरी लवकरच दिसेल,’’ असे नदालने सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा