* राफेल नदालची विक्रमी आठव्या जेतेपदाला गवसणी
* डेव्हिड फेररचे पहिल्यावहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदाचे स्वप्न भंगले
लाल मातीवरचा तो अनभिषिक्त सम्राट आहे.. इथे त्याच्या वर्चस्वाला आव्हान देण्याची क्षमता कुणामध्येच नाही, याची पुन्हा एकदा टेनिसरसिकांना प्रचिती आली.. ऐतिहासिक रोलँड गॅरोसवर त्याने एक-दोनदा नव्हे, तर तब्बल आठव्यांदा फ्रेंच जेतेपद उंचावण्याची किमया साधली.. स्पेनचा हा ‘झपाटलेला’ टेनिसपटू म्हणजे राफेल नदाल..
रविवारी अंतिम सामन्यात जीवलग मित्र आणि देशबांधव डेव्हिड फेरर समोर उभा ठाकलेला, पण क्ले कोर्टवर तो एखाद्या झंझावाताप्रमाणे खेळला.. आणि २ तास १६ मिनिटांच्या लढतीत फेरर  ६-३, ६-२, ६-३ अशा फरकाने निष्प्रभ ठरला. एखाद्या ग्रँड स्लॅम स्पर्धेचे आठव्यांदा जेतेपद काबीज करणारा नदाल पहिला टेनिसपटू ठरला. फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या लाल मातीवर २००५मध्ये पदार्पण केल्यापासून नदालने ६० पैकी ५९ सामन्यांत विजय संपादन केला आहे. या आकडेवारीवरूनच नदालची मक्तेदारी दिसून येते.
यंदा या स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्यांच्या लढतीत नदाल चाचपडत होता. काही वेळा त्याच्यावर सेट गमावण्याची वेळ आली. मात्र तरीही त्याने निर्धाराने आगेकूच केली. उपांत्य फेरीच्या लढतीत नोव्हाक जोकोव्हिचसारख्या जिद्दी खेळाडूला नमवल्याने नदालचा आत्मविश्वास उंचावला. हा आत्मविश्वास आणि लाल मातीवर अंतिम लढतीत खेळण्याचा पूर्वानुभव या बळावर त्याने आपल्या खात्यावर बाराव्या ग्रँड स्लॅम अजिंक्यपदाची भर टाकली.
ताकदवान सव्‍‌र्हिस, कोर्टवरचा सहज वावर, भात्यातल्या सर्व फटक्यांचा चतुराईने केलेला उपयोग आणि अफाट ऊर्जा या गुणांच्या बळावर नदालने हा इतिहास घडवला. अंतिम फेरीची लढत सुरू असताना फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्कोइस हॉलंडे यांचा राजीनामा मागणाऱ्या समर्थकांनी निदर्शने केल्याने सामन्यात व्यत्यय आणला. मात्र या प्रकारानेही नदालची एकाग्रता भंग पावली नाही.
सामना सुरू झाल्यानंतर फेररने पहिला गेम जिंकला. मात्र फेररच्या फोरहँडच्या खराब फटक्यामुळे नदालने २-१ अशी आघाडी घेतली. फेररने चिवट खेळ करत २-२ अशी बरोबरी केली. मात्र यानंतर नदालने बॅकहँडच्या अफलातून फटक्याच्या जोरावर आगेकूच केली. नवव्या गेममध्ये फेररच्या हातून झालेल्या दुहेरी चुकीमुळे नदालला सेटपॉइंट मिळाला. फेररचा फटका नेटवर आदळला आणि नदालने पहिला सेट नावावर केला. अंतिम फेरीपर्यंतच्या प्रवासात फेररने एकही सेट गमावला नव्हता. मात्र नदालने त्याचा हा विक्रम मोडला.
दुसऱ्या सेटमध्ये नदालने झटपट ३-० अशी आघाडी घेतली. फोरहँडच्या शानदार फटक्यांद्वारे नदालने ही आघाडी मिळवली. मात्र यानंतर झुंजार खेळ करत पिछाडी भरून काढत गुणसंख्या १-३ अशी नेली. चार ब्रेकपॉइंट्स वाचवण्यात अपयश आल्याने नदालने ५-१ अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. त्यानंतर नदाल सव्‍‌र्हिस करीत असताना निदर्शकांनी सामन्यात व्यत्यय आणला. मात्र पोलिस आणि संयोजकांनी त्यांना वेळीच रोखत अनुचित प्रसंग टाळला. या घटनेचा नदालच्या कामगिरीवर परिणाम झाला नाही. फेररच्या दुहेरी चुकांचा फायदा उठवत नदालने दुसरा सेटही जिंकला.
तिसऱ्या आणि अंतिम सेटमध्येही नदालने २-० अशी आघाडी मिळवली. मात्र फेररने सामन्यातले आव्हान जिवंत राखण्यासाठी जोरदार मुसंडी मारत २-२ अशी बरोबरी केली. ताकदवान सव्‍‌र्हिसच्या जोरावर नदालने ३-२ आगेकूच केली. मात्र फेररने टक्कर देत ३-३ अशी बरोबरी केली. यानंतर जेतेपद जिंकण्याच्याच इराद्याने नदालने खेळ केला. फेररची सव्‍‌र्हिस वारंवार भेदत नदालने ४-३ आघाडी ५-३ वर नेली. फेररच्या चुकीच्या फटक्यांचा फायदा उठवत नदालने तिसऱ्या सेटसह ऐतिहासिक विजय साकारला.

माझ्या कुटुंबातील सर्वाचे आणि माझ्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो. त्यांच्या पाठिंब्याशिवाय हे यश मिळू शकले नव्हते. दुखापतीमुळे मी कोर्टपासून दूर असताना त्यांनीच मला आधार दिला. ‘ट्विटर’ आणि ‘फेसबुक’च्या माध्यमातून मला शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येकाचे आभार. तुमच्या शुभेच्छांनी मला सकारात्मक उर्जा दिली!!
-राफेल नदाल

Story img Loader