आठव्यांदा विजेतेपद मिळविण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या रॅफेल नदाल याला फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत यंदा विजेतेपदासाठी खडतर आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. त्याला उपांत्य फेरीत अग्रमानांकित नोवाक जोकोवीच याच्याशी खेळावे लागण्याची शक्यता आहे.
नदाल याला तिसरे मानांकन मिळाले आहे. माजी विजेता रॉजर फेडरर याला द्वितीय मानांकन देण्यात आले आहे. त्याला अंतिम फेरीपर्यंत तुल्यबळ आव्हान मिळण्याची शक्यता कमी आहे. गतवर्षी नदालने येथील अंतिम फेरीत जोकोवीच याच्यावर मात केली होती. जोकोवीच याला सलामीच्या लढतीत बेल्जियमच्या डेव्हिड गॉफिनशी खेळावे लागणार आहे. नदालपुढे पहिल्या फेरीत जर्मनीच्या डॅनियल ब्रँड्सचे आव्हान आहे.
महिला गटात अग्रमानांकित सेरेना विल्यम्सला पहिल्या फेरीत बेलारुसच्या अॅना तातिश्वेली हिच्याशी खेळावे लागणार आहे. गतविजेत्या मारिया शारापोवा हिला दुसरे मानांकन मिळाले असून तिला तैवानच्या हेईश सुवेई हिच्याविरुद्ध लढत द्यावी लागणार आहे. तिसरी मानांकित व्हिक्टोरिया अॅझारेन्का हिची पहिल्या फेरीत रशियाच्या एलिना वेसनिना हिच्याशी गाठ पडणार आहे. ३१ वर्षीय सेरेना ही यंदा विजेतेपदासाठी मुख्य दावेदार मानली जात आहे. तिने यंदाच्या मोसमात मियामी, चार्ल्सस्टोन, माद्रिद व रोम येथे झालेल्या स्पर्धामध्ये अजिंक्यपद मिळविले आहे. तिने आतापर्यंत कारकिर्दीत ५१ विजेतेपद मिळविली असून २००४ पासून तिने शारापोवाविरुद्ध एकदाही पराभव स्वीकारलेला नाही. अॅग्नीझेका राडवानस्का हिला चौथे मानांकन मिळाले आहे. माजी विजेती खेळाडू ली ना हिला सहावे मानांकन मिळाले आहे.
फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : नदालचा मार्ग खडतर
आठव्यांदा विजेतेपद मिळविण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या रॅफेल नदाल याला फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत यंदा विजेतेपदासाठी खडतर आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. त्याला उपांत्य फेरीत अग्रमानांकित नोवाक जोकोवीच याच्याशी खेळावे लागण्याची शक्यता आहे.
First published on: 25-05-2013 at 01:50 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rafael nadal could get novak djokovic in french open semis