ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये टेनिसपटू राफेल नदालला पहिल्याच फेरीत पराभवाचा फटका बसला आहे. बिगरमानांकित फर्नांडो वर्डास्को या स्पॅनिश टेनिसपटूने राफेल नदाल या माजी जगज्जेत्यास ७-६(६),४-६,३-६, ७-६(४), ६-२ असे पराभूत करून धक्कादायक निकालाची नोंद केली.
पहिल्या सेटपासूनच राफेल झगडताना दिसून आला. ही लढत तब्बल ४ तास ४१ मिनिटे चालली. यापूर्वीही २००९ मध्ये वर्डास्को आणि नदाल यांच्यात  ऑस्ट्रेलियन ओपनमध्येच झालेला सामना पाच तासांहून अधिक काळ चालला होता. मात्र, हा सामना नदालने जिंकला होता. वर्डास्कोने आज या पराभवाची परतफेड केली. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये नदालला प्रथमच पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागला आहे. याआधीही नदालला विम्बल्डनच्या दुसऱया फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले होते.