पंधरा दिवसांपूर्वी फ्रेंच खुल्या स्पर्धेचे विक्रमी आठवे जेतेपद कमावणारा ‘लाल मातीचा बादशाह’ राफेल नदालला विम्बल्डनच्या हिरवळीवर सलामीच्या लढतीतच धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. बेल्जियमच्या स्टीव्ह डार्सिसने पाचव्या मानांकित नदालला ७-६, ७-६, ६-४ असे सरळ सेट्समध्ये चीतपट करत सनसनाटी विजयाची नोंद केली. पहिल्या फेरीत बाद होण्याची नदालची ही पहिलीच वेळ आहे. गेल्यावर्षी याच स्पर्धेत अनुनभवी रोसोलने दुसऱ्याच फेरीत नदालला गाशा गुंडाळायला लावला होता.
खराब फॉर्म आणि दुखापती बाजूला सारत रॉजर फेडररने विम्बल्डन स्पर्धेत विजयी सलामी दिली. महिलांमध्ये अव्वल मानांकित मारिया शारापोव्हा आणि व्हिक्टोरिया अझारेन्का यांनीही विजयी सुरुवात करत दुसऱ्या फेरीत आगेकूच केली.
फेडररने रोमानियाच्या व्हिक्टर हानेस्क्युवर ६-३, ६-२, ६-० असा सहज मिळवला. क्रोएशियाच्या मारिन चिलिचने सायप्रसच्या मार्कस बघदातिसचा ६-३, ६-४, ६-४ असा धुव्वा उडवला. जो-विल्फ्रेड त्सोंगाने बेल्जियमच्या डेव्हिड गॉफिनचा ७-६ (७-४), ६-४, ६-३ असा पराभव केला. महिलांमध्ये शारापोव्हाने फ्रान्सच्या ख्रिस्टिना लाडइनोव्हिकचा ७-६ (७-५), ६-३ असा पराभव केला. व्हिक्टोरिया अझारेन्काने मारिया कोहलरला ६-१, ६-२ असे नमवले.