जेतेपद कुणालाही मिळो मात्र अंतिम लढत चुरशीची आणि सर्वोत्तम प्रदर्शनाची व्हावी ही टेनिसप्रेमींची इच्छा फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष गटाच्या अंतिम लढतीने पूर्ण होणार आहे. गतविजेत्या राफेल नदालने अँडी मरेचा सरळ सेट्समध्ये धुव्वा उडवत, तर नोव्हाक जोकोव्हिचने इर्नेस्ट गुलबिसवर विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. या स्पर्धेची विक्रमी आठ जेतेपदे नावावर असणाऱ्या नदालने या स्पर्धेतल्या ६५ लढतींत विजय मिळवला आहे आणि केवळ एका लढतीत त्याला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. जेतेपदाच्या निमित्ताने लाल मातीवरची मक्तेदारी आणखी बळकट करण्यासाठी नदाल आतुर आहे. दुसरीकडे कारकिर्दीत ग्रँडस्लॅम विजयांचे वर्तुळ पूर्ण करण्यासाठी जोकोव्हिच उत्सुक आहे. झुंजार आणि मॅरेथॉन लढतींसाठी प्रसिद्ध या दोघांमध्ये अंतिम फेरीचा थरार रंगणार आहे. महिलांमध्ये जेतेपदासाठी मारिया शारापोव्हा आणि सिमोन हालेप यांच्यात लढत होणार आहे.
नदालने अँडी मरेचे आव्हान ६-३, ६-२, ६-१ असे संपुष्टात आणत अंतिम फेरी गाठली. नदालने संपूर्ण सामन्यात एकही ब्रेकपॉइंट गमावला नाही यावरूनच त्याचे वर्चस्व सिद्ध होते. ग्रासकोर्टवर सुरेख खेळ करणाऱ्या सातव्या मानांकित मरेचा नदालच्या झंझावातासमोर टिकाव लागला नाही. मरेच्या असंख्य चुकांचा फायदा उठवत आणि फोरहँडच्या ताकदवान फटक्यांच्या आधारे नदालने एकतर्फी विजय मिळवला.
उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लढतीत जोकोव्हिचला विजयासाठी थोडा संघर्ष करावा लागला. द्वितीय मानांकित जोकोव्हिचने लॅटव्हिआच्या इर्नेस्ट गुलबिसवर ६-३, ६-३, ३-६, ६-३ अशी मात करत अंतिम फेरी गाठली. अनुभवाला साजेसा सातत्यपूर्ण खेळ करत जोकोव्हिचने पहिला आणि दुसरा सेट नावावर केला. तिसऱ्या सेटमध्ये गुलबिसने जोकोव्हिचची एकाग्रता भंग करत आगेकूच केली. अचूक सव्र्हिसवर भर देत गुलबिसने ताकदवान फटक्यांचा उपयोग करत जोकोव्हिचला नामोहरम केले. तिसरा सेट जिंकत गुलबिसने झुंजार पुनरागमन केले. चौथ्या सेटमध्ये मात्र जोकोव्हिचने लौकिकाला साजेसा खेळ करत बाजी मारली.
शारापोव्हा-हालेप यांच्यांमध्ये आज अंतिम सामना
अव्वल मानांकित खेळाडूंनी गाशा गुंडाळल्यामुळे जेतेपदाच्या खुल्या झालेल्या शर्यतीसाठी मारिया शारापोव्हा आणि सिमोन हालेप यांच्यात मुकाबला रंगणार आहे. सातव्या मानांकित शारापोव्हाने कॅनडाच्या इग्युेन बोऊचार्डला नमवत, तर रोमानियाच्या सिमोन हालेपने आंद्रेआ पेटकोव्हिकवर विजय मिळवत कारकिर्दीत पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणारी सिमोन ३४ वर्षांनंतरची रोमानियाची पहिली महिला खेळाडू ठरली आहे. ९० मिनिटे चाललेल्या लढतीत २२ वर्षीय चौथ्या मानांकित सिमोनने आंद्रेआवर ६-२, ७-६ (७-४) अशी मात केली. शारापोव्हाविरुद्धच्या तिन्ही लढतीत सिमोनला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा