नव्या हंगामात नवे विजेते घडण्याच्या दिशेने आणखी एक दमदार पाऊल पडले आहे. चेक प्रजासत्ताकच्या उंचपुऱ्या टॉमस बर्डीचने अफलातून खेळ करत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत जेतेपदाचा दावेदार असणाऱ्या राफेल नदालचे आव्हान संपुष्टात आणले. रॉजर फेडररपाठोपाठ नदालही माघारी परतल्याने जेतेपदाचा मुकाबला दुसऱ्या फळीतील खेळाडूंसाठीही खुला झाला आहे. अन्य लढतींमध्ये अ‍ॅण्डी मरेने प्रेक्षकांचा प्रचंड पाठिंबा लाभलेल्या ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गियॉसला नमवत उपांत्य फेरी गाठली. ‘सौंदर्यवती अप्सरांचा मुकाबला’ अशा शब्दांत गौरवलेल्या महिलांच्या लढतीत मारिया शारापोव्हाने कॅनडाच्या युवा युझेनी बुचार्डवर मात करत उपांत्य फेरीत स्थान पटकावले.
चेक प्रजासत्ताकच्या बर्डीच या सातव्या मानांकित खेळाडूने तिसऱ्या मानांकित व माजी विजेत्या नदालला ६-२, ६-०, ७-६ (७-५) असा दणका देत आपणही विजेतेपदाचे प्रबळ दावेदार आहोत, याची झलक दिली. बर्डीचच्या धडाकेबाज खेळापुढे नदाल याचा बचाव खूपच निष्प्रभ ठरला. पहिल्या दोन्ही सेटमध्ये नदाल हा पुरता गोंधळलेला होता. तिसऱ्या सेटमध्ये त्याने सव्‍‌र्हिसवर नियंत्रण मिळविले. त्याने सव्‍‌र्हिसवर सहाही गेम्स जिंकले. बर्डीच यानेही तेवढय़ाच सव्‍‌र्हिस गेम घेतल्यामुळे हा सेट टायब्रेकपर्यंत रंगतदार झाला. बर्डीचने फोरहॅण्डच्या ताकदवान फटक्यांचा बहारदार खेळ केला व नदालची सव्‍‌र्हिस तोडण्यात यश मिळविले. उपांत्य फेरीत बर्डीचसमोर मरेचे आव्हान असणार आहे.
नदालच्या पराभवामुळे इंग्लंडच्या अ‍ॅण्डी मरे याच्या विजेतेपदाच्या मार्गातील मोठे आव्हान दूर झाले आहे. ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पध्रेत तीन वेळा विजेतेपदाच्या उंबरठय़ावरून पराभूत झालेल्या मरेने स्थानिक खेळाडू निक किर्गिओसवर ६-३, ७-६ (७-५), ६-३ अशी सरळ तीन सेट्समध्ये मात केली. १९ वर्षीय खेळाडू निकविरुद्ध मरेने आतापर्यंत ११ सामने जिंकले आहेत. ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत अनुभव महत्त्वाचा असतो हे मरे याने दाखवून दिले. क्रॉसकोर्ट फटके व व्हॉलीजचा कल्पक उपयोग करत मरेने सुरेख विजय साकारला.
विजेतेपदाची संभाव्य दावेदार असलेल्या रशियाच्या शारापोव्हाने सातवी मानांकित युझेनी बुचार्डचा ६-३, ६-२ असा दणदणीत पराभव केला. शारापोव्हाने केलेल्या आक्रमक खेळापुढे कॅनेडाच्या बुचार्डपुढे प्रत्युत्तर नव्हते. रशियाच्या एकतेरिना माकारोव्हाने मारियाकडून स्फूर्ती घेत हॅलेपची अपराजित्वाची मालिका ६-४, ६-० अशी संपुष्टात आणली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा