फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा आठव्यांदा जिंकल्यानंतर रॅफेल नदाल या स्पॅनिश खेळाडूचे ध्येय आहे ते रॉजर फेडरर याला मागे टाकण्याचे. फेडरर याने एकेरीत १७ ग्रँड स्लॅम विजेतेपदे मिळविली आहेत.
फेडरर या ३२ वर्षीय खेळाडूने आपले शेवटचे विजेतेपद गतवर्षी विम्बल्डनमध्ये मिळविले आहे. स्पर्धात्मक खेळातून निवृत्त होण्यापूर्वी त्याला एकदोन विजेतेपदे मिळविण्याची संधी आहे. नदाल हा २७ वर्षांचा असून आतापर्यंत त्याने बारा ग्रँड स्लॅम विजेतेपदे मिळविली आहेत. फ्रेंच स्पर्धा जिंकल्यानंतर नदाल याने सांगितले, फेडररइतकी कामगिरी करणे सोपे नसले तरी अवघडही नाही. आणखी तीनचार वर्षे खेळत राहिल्यास त्याला मागे टाकणे मला शक्य आहे. मी सतत उंच ध्येय पाहत असतो. मला सहकारी स्टाफ हा अतिशय प्रोत्साहन देणारा आहे. त्यामुळे मला अडचणीच्या प्रसंगी अनेक वेळा मदत झाली आहे. माझे कुटुंबीय व मित्रमंडळी यांचेही वेळोवेळी मला मार्गदर्शन मिळत असते. विविध स्पर्धांनिमित्त मी अनेक देश हिंडत असतो. ही भटकंती मनाला प्रेरणा देणारी असते. त्यामुळे वैयक्तिक समाधान मिळत असते.
नदालने आतापर्यंत आठ वेळा फ्रेंच स्पर्धा जिंकली आहे तसेच त्याने ऑस्ट्रेलियन, विम्बल्डन व अमेरिकन स्पर्धेतही अजिंक्यपद मिळविले आहे. आणखी दोन आठवडय़ांनी विम्बल्डन स्पर्धा सुरू होत आहे. त्यापूर्वी पुरेशी विश्रांती घेण्याचे त्याचे ध्येय आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा