Rafael Nadal on Carlos Alcaraz: सातवेळा चॅम्पियन नोव्हाक जोकोव्हिचविरुद्ध विम्बल्डन पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत विजेतेपद मिळवण्यासाठी २० वर्षीय खेळाडूने जबरदस्त कामगिरी केल्यानंतर स्पेनचा अव्वल टेनिस स्टार आणि अल्कराझचा आयडॉल राफेल नदालने कार्लोस अल्कराझला खास शुभेच्छा दिल्या आहेत. रविवारी विम्बल्डन २०२३ ची ट्रॉफी हे कार्लोसचे दुसरे ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरले. या स्पॅनिश खेळाडूने २०२२ साली यू.एस. ओपन जिंकून त्याचे पहिले ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले होते. २० वर्षीय अल्कराझने ४ तास, ४२ मिनिटांत विम्बल्डनमध्ये जोकोव्हिचची ३४ सामन्यांची विजयी मालिका खंडित केली.
अल्कराझने त्याचे दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकल्यानंतर, २२ वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नदालने २० वर्षीय अल्कराझचे शानदार अभिनंदन केले आहे. त्याने ट्वीटरवरून एक खास संदेश त्याच्यासाठी लिहिला आहे. राफेल अल्कराझला म्हणतो की, “अभिनंदन @carlosalcaraz. आज तू आम्हाला खूप आनंद दिला आहेस आणि मला खात्री आहे की, स्पॅनिश टेनिसमधला आमचा प्रणेता मॅनोलो सँटाना, जिथे कुठे असेल तो हे बघून खूप खुश असेल. विम्बल्डनमध्ये ज्याप्रमाणे २३ ग्रँड स्लॅम विजेत्या नोव्हाकला हरवले ते खूपचं अविश्वसनीय आहे. ज्या ठिकाणी मॅनोलो सँटानाने विजय मिळवला होता आज त्याच ठिकाणी हजेरी लावत जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याचाही असाच त्याठिकाणी कौतुक झाले होते. तुला माझ्याकडून एक मोठी मिठी आणि या क्षणाचा आनंद असच घेत राहा, चॅम्पियन!” नदालने त्याच्या ट्वीटमध्ये लिहिले.
याआधी जोकोव्हिच आणि अल्कराझ तीनवेळा आमनेसामने आले आहेत
जर जोकोव्हिचने फायनल जिंकली असती तर हे त्याचे २४वे ग्रँडस्लॅम ठरले असते आणि त्याने मार्गारेट कोर्टच्या पुरुष आणि महिलांमध्ये सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या विक्रमाची बरोबरी केली असती. तसेच, जोकोविचचे हे एकूण आठवे आणि सलग पाचवे विम्बल्डन विजेतेपद ठरले असते. या दोन्ही बाबतीत त्याने फेडररची बरोबरी केली असती. मात्र, यापैकी काहीही होऊ शकले नाही.
जोकोव्हिच आणि अल्कराझ आतापर्यंत तीनदा आमनेसामने आले आहेत. जोकोव्हिचने एक आणि अल्कराझने दोन सामने जिंकले आहेत. या फायनलपूर्वी या वर्षाच्या सुरुवातीला पॅरिसमध्ये फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत दोघेही भिडले होते. त्यानंतर जोकोव्हिचने क्ले कोर्टवर स्पॅनिश खेळाडूचा ६-३, ५-७, ६-१, ६-१ असा पराभव केला होता. त्या सामन्यात अल्काराझला दुखापत झाली आणि तरीही त्याने संपूर्ण सामना खेळला. त्याच वेळी, अल्काराझने २०२२ एटीपी मास्टर्स १००० माद्रिदमध्ये जोकोव्हिचचा ६-७, ७-५, ७-६ असा पराभव केला.
अल्कराझने हे रेकॉर्ड केले
अल्कराझने जोकोव्हिचच्या विम्बल्डनमध्ये सलग ३४ सामने जिंकण्याच्या विक्रमाला ब्रेक लावला. बोरिस बेकर आणि ब्योर्न बोर्ग यांच्यानंतर तो तिसरा सर्वात तरुण विम्बल्डन चॅम्पियन बनला. २१ वर्षांचा होण्यापूर्वी विम्बल्डन जिंकणारा अल्कराज हा बेकर आणि ब्योर्ननंतर ओपन एरामधील तिसरा खेळाडू आहे. दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावणारा तो पाचवा सर्वात तरुण खेळाडू आहे. २०२२ मध्ये अल्कराझने यूएस ओपन जिंकले. ग्रँड स्लॅम स्पर्धेत जोकोव्हिचला पराभूत करणारा अल्कराझ हा दुसरा सर्वात तरुण खेळाडू आहे.