एपी, पॅरिस

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्ले कोर्टचा (लाल माती) सम्राट मानला जाणारा आणि तब्बल १४ वेळा विजेतेपद मिळविणाऱ्या राफेल नदालवर यंदाच्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पहिल्याच फेरीत गारद होण्याची वेळ आली. जर्मनीच्या चौथ्या मानांकित ॲलेक्झांडर झ्वेरेवने सोमवारी पहिल्या फेरीच्या लढतीत नदालचा ६-३, ७-६(७-५), ६-३ असा पराभव केला. नदालला दुखापतीमुळे निर्माण झालेल्या अपयशाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडता आले नाही. नदालवर कारकीर्दीत प्रथमच या स्पर्धेत पहिल्या फेरीत पराभूत होण्याची नामुष्की ओढवली.

कारकीर्दीत २२ ग्रँडस्लॅम विजेतीपदे मिळविणाऱ्या नदालने सर्वात प्रथम २००५ मध्ये फ्रेंच टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. त्यानंतर २०२२ मध्ये तो येथे अखेरची स्पर्धा जिंकला. त्यानंतर मात्र दुखापतीने नदालच्या कारकीर्दीला उतरती कळा लागली.

पहिला सेट गमावल्यानंतर नदालने दुसऱ्या सेटमध्ये ४-२ अशी आघाडी मिळवली होती. लढतीमधील दहाव्या गेमला दोन ब्रेक पॉइंट वाचवून झ्वेरेवने ‘सर्व्हिस’ राखली आणि त्यानंतर टायब्रेकरमध्ये बाजी मारली. तिसऱ्या सेटलाही नदाल सुरवातीलाच ब्रेकची संधी साधून २-० असा आघाडीवर होता. या वेळीही झ्वेरेवने लगेच बाजी मारून २-२ अशी बरोबरी साधली. सातव्या गेमला आणखी एकदा नदालची ‘सर्व्हिस’ भेदत झ्वेरेवने मिळवलेली आघाडी कायम राखत विजयावर शिक्कामोर्तब केले.

हेही वाचा >>> कोलकाताच्या यशाच्या पडद्यामागचे नायक!

नदाल आणि झ्वेरेव दोघांसाठी ही लढत प्रतिष्ठेची होती. झ्वेरेवने विजयानंतर काय बोलू? अशीच सुरुवात केली. लहानपणापासून ज्याचा खेळ बघत कोर्टवर उतरलो त्याच्याबरोबर खेळायला मिळणे हीच मोठी गोष्ट आहे. आजचा दिवस त्याचा नव्हता. पण, हा क्षण त्याचा आहे असे म्हणत झ्वेरेव अखेरच्या प्रतिक्रियेसाठी कोर्टवरून बाजूला झाला आणि नदालला बोलण्याची संधी दिली.

खरंच, या क्षणी बोलणे माझ्यासाठी कठिण आहे अशी सुरुवात नदालने केली. पण, त्याचा स्वर भारावलेला होता. जगभरातून आलेल्या चाहत्यांशी बोलताना नदाल म्हणाला, ‘‘मला माहित नाही की तुमच्यासमोर मी अखेरचा सामना खेळलो आहे. जर हा खरेच हा अखेरचा सामना असेल, तर मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला. आता माझ्या मनात काय भावना आहेत हे शब्दात सांगणे खूप कठीण आहे. तुमच्यासारखे चाहते जेव्हा मोठ्या संख्येने पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असतात, तेव्हा खेळण्यासाठी वेगळा हुरुप येतो.’’

नदालने शेवटी झ्वेरेवच्या खेळाचेही कौतुक केले. झ्वेरेव गुणी आणि चांगला खेळाडू आहे. त्याला स्पर्धेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा..असे म्हणून नदालने माईक परत केला, तेव्हा कोर्टवर उपस्थित प्रत्येक जण नदालला निरोप देण्यासाठी उभा राहिला होता.

श्वीऑटेक, त्सित्सिपासची आगेकूच

पोलंडच्या अग्रमानांकित इगा श्वीऑटेकने महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला. तर, ग्रीसचा स्टेफानोस त्सित्सिपास व इटलीचा यानिक सिन्नेर यांनीही पुरुष एकेरीच्या सामन्यात विजय नोंदवत आगेकूच केली. महिला एकेरीच्या सामन्यात श्वीऑटेकने फ्रान्सच्या लिओलिया जीनजीनवर ६-१, ६-२ असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला. तर, ओन्स जाबेऊरने साचिआ विकेरीला ६-३, ६-२ असे पराभूत करत पुढच्या फेरीत स्थान मिळवले. पुरुष एकेरीच्या सामन्यात सिन्नेरने अमेरिकेच्या ख्रिास्तोफर यूबँक्सला ६-३, ६-३, ६-४ असे सरळ सेटमध्ये नमवत दुसऱ्या फेरीत धडक मारली. तर, त्सित्सिपासने हंगेरीच्या मार्टोन फुक्सोविक्सला ७-६ (९-७), ६-४, ६-१ असे पराभूत केले. स्वित्झर्लंडच्या स्टॅन वावरिंकाने ब्रिटनच्या अँडी मरेचे आव्हान ६-४, ६-४, ६-२ असे सरळ सेटमध्ये संपुष्टात आणले. भारताच्या सुमित नागलला कारेन खाचनोवकडून २-६, ०-६, ६-७ (५-७) असे पराभूत व्हावे लागले.

हे असे कोर्ट आहे की ज्यावर मी सर्वाधिक प्रेम करतो. वयाच्या ३८व्या वर्षी मी कोर्टवर खेळू शकेन की नाही असे वाटले नव्हते. पण, मी खेळलो आणि आनंदही घेतला. तुमच्यासमोर पुन्हा येण्याची खूप इच्छा आहे, पण त्याबाबत अजून खात्री नाही. – राफेल नदाल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rafael nadal loses in the french open s first round to alexander zverev zws