इंडियन ऐसचा यूएई रॉयल्सवर विजय
स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल याने इंटरनॅशनल प्रीमिअर टेनिस लीगमध्ये (आयपीटीएल) झोकात पदार्पण केले. गतविजेत्या इंडियन ऐस संघाकडून खेळणाऱ्या नदालने पहिल्याच सामन्यात थॉमस बर्डिचवर टायब्रेकरमध्ये ६-५ (७-३) असा विजय मिळवला. इंडियन ऐसने ३०-१८ अशा फरकाने विजय मिळवत हॅट्ट्रिक साजरी केली. दुसऱ्या सामन्यात यजमान फिलीपाईन्स माव्हेरिक्सने २५-२१ अशा फरकाने जपान वॉरियर्सवर निसटता विजय मिळवला.
‘‘गतवर्षी काही खेळाडूंकडून आयपीटीएलबाबत काही आश्चर्यकारक गोष्टी मी ऐकल्या होत्या. गतवर्षीच या स्पध्रेत खेळण्याचा मानस होता, परंतु दुखापतीमुळे ते जमले नाही. मात्र, आज येथे खेळून उत्साह वाटत आहे. टेनिसमधील हा चांगला प्रकार आहे आणि आयोजकांनीही त्याची मांडणी अचूक केली आहे,’’ असे मत नदालने व्यक्त केले.
आयपीटीएलच्या मलिना लीगच्या लढतीत नदालचे आगमन होताच प्रेक्षकांकडून एकच जल्लोष झाला. स्पध्रेच्या पहिल्या लढतीत सानिया मिर्झा व रोहन बोपन्ना या जोडीने २६ मिनिटांच्या खेळात डॅनिएल नेस्टर व क्रिस्टीना मॅलडेनोव्हीकचा पराभव करून ऐसला आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सामन्यात समांथा स्तोसूरने ६-३ अशा फरकाने क्रिस्टीनावर विजय मिळवला. हे विजयी सत्र फॅब्रीक सँटोरो व नदाल/डॉडीग या जोडीने कायम राखले. त्यांनी अनुक्रमे गोरॅन इव्हानिसेव्हीवर ६-३ आणि नेस्टर/ बर्डिचवर ६-३ असा विजय मिळवला. अखेरच्या सेटमध्ये बर्डिचने नदालला कडवी झुंज दिली, परंतु ३५ मिनिटांच्या या सामन्यात नदालने टायब्रेकरमध्ये बाजी मारली.
दिल्लीत खेळण्यासाठी मी उत्सुक आहे. या स्पध्रेच्या निमित्ताने पहिल्यांदाच दिल्लीत खेळण्याची संधी मिळणार आहे. यापूर्वी मी अनेकदा चेन्नईत खेळलो आहे. तसेच माझी संस्था अनंतपूर येथे कार्यरत आहे आणि त्या संस्थेतून काही मुलं दिल्लीत सामना पाहायला येणार असल्याचा आंनद होत आहे.

– राफेल नदाल