‘रोलँड गॅरोसवरील सम्राट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राफेल नदाल व त्याचा पारंपरिक प्रतिस्पर्धी नोव्हाक जोकोव्हिच यांनी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील दहाव्या विजेतेपदाच्या दिशेने धडाकेबाज वाटचाल केली आहे. पुरुषांच्या गटात टॉमस बर्डीच, तर महिलांमध्ये अग्रमानांकित सेरेना विल्यम्ससह अ‍ॅना इव्हानोव्हिक व आठवी मानांकित तिमिया बासिनस्की यांनी आगेकूच केली आहे
चौथ्या मानांकित नदालने अर्जेटिनाच्या फाकुंडो बोगेनोईसवर ६-३, ६-०, ६-३ असा एकतर्फी विजय मिळवला. त्याने केलेल्या वेगवान सव्‍‌र्हिस व फोरहँडच्या ताकदवान फटक्यांपुढे फाकुंडोचा बचाव निष्फळ ठरला. अग्रमानांकित जोकोव्हिचला बेल्जियमच्या स्टीव्ह डार्किसविरुद्ध ७-५, ६-३, ६-४ असा विजय मिळवताना थोडासा संघर्ष करावा लागला. स्टीव्हने तिन्ही सेट्समध्ये जमिनीलगत सुरेख फटके व नेटजवळून प्लेसिंग असा खेळ करीत चांगली झुंज दिली. मात्र सर्बियाच्या जोकोव्हिचने अनुभवाचा पुरेपूर लाभ घेत हा सामना जिंकला.
चेक प्रजासत्ताकच्या सातव्या मानांकित टॉमस बर्डीचने टय़ूनिशियाच्या मॅलेक जाझिरीचा ६-१, २-६, ६-२, ६-४ असा पराभव केला. इंग्लंडच्या अलजाझ बेदिनीने स्पेनच्या पाब्लो कॅरिना बुस्तावर ७-६ (७-४), ६-३, ४-६, ५-७, ६-२ असा रोमहर्षक विजय नोंदवला. पाच सेट्सपर्यंत रंगतदार झालेल्या या लढतीद्वारे प्रेक्षकांना टेनिसचा आनंद मिळाला. पहिले दोन सेट्स गमावल्यानंतर पाब्लोने दोन सेट्स घेत सामन्यातील उत्कंठा वाढवली. मात्र पाचव्या सेटमध्ये अलजाझने स्मॅशिंगच्या सुरेख फटक्यांचा उपयोग करीत सव्‍‌र्हिस ब्रेक मिळवला. त्याचा फायदा घेत त्याने हा सेटसह सामना जिंकला.
विजेतेपदाची दावेदार असलेल्या सेरेना ने ब्राझीलच्या तिलियाना परेराचा ६-२, ६-१ असा धुव्वा उडवला. एकतर्फी झालेल्या लढतीत तिने आपल्या दर्जाला साजेसा आक्रमक खेळ केला.
कॅनडाची अनुभवी खेळाडू एवगेनी बुचार्डला पराभवाचा धक्का बसला. दुसऱ्या फेरीतील सरळ लढतीत आठव्या मानांकित तिमियाने तिला ६-४, ६-४ असे हरवले. इव्हानोव्हिकने जपानच्या कुरुमी नारावर ७-५, ६-१ अशी मात केली. पहिल्या सेटमध्ये कुरुमीने चिवट लढत दिली. मात्र नंतर तिची दमछाक झाली. स्पेनच्या बाराव्या मानांकित कार्ला सोरेझ नॅव्हेरोनेही तिसरी फेरी गाठली. तिने चीनची खेळाडू किआंग वाँगचा ६-१, ६-३ असा धुव्वा उडवला. नेदरलँड्सच्या किका बर्टन्सने अनपेक्षित विजयाची मालिका कायम ठेवली. तिने इटलीच्या कॅमिला गिओर्गीचे आव्हान ६-४, ६-१ असे संपुष्टात आणले. दुहेरीत एकतेरिना माकारोव्हा व एलिना व्हेसनिना या रशियन जोडीने समंथा स्टोसूर व शुआई झांग यांना ६-१, ६-४ असे हरवले.

पेस-हिंगिस जोडीची मिश्र दुहेरीत विजयी सलामी
भारताच्या लिएण्डर पेसने स्वित्र्झलडच्या मार्टिना हिंगिसच्या साथीने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील मिश्र दुहेरी प्रकारात विजयी सलामी नोंदवली. त्यांनी अ‍ॅना लिना ग्रोएनफिल्ड (जर्मन) व रॉबर्टा फराह (कोलंबिया) यांच्यावर ६-४, ६-४ अशी मात केली.
पहिल्या सेटमध्ये सुरुवातीला दोन्ही जोडय़ांनी सव्‍‌र्हिस ब्रेक केली. त्यामुळे २-२ अशी बरोबरी झाली. पेस व हिंगिस यांनी पुन्हा सव्‍‌र्हिस ब्रेक मिळवत पाठोपाठ सव्‍‌र्हिस राखली. त्यामुळे त्यांना ४-२ अशी आघाडी मिळाली. आघाडी कायम ठेवीत त्यांनी हा सेट घेतला. या जोडीने फोरहँडच्या ताकदवान फटक्यांचा सुरेख खेळ केला.
दुसऱ्या सेटमधील तिसऱ्याच गेमच्या वेळी पेस व हिंगिस यांनी सव्‍‌र्हिस ब्रेक मिळवला. या जोडीला पुन्हा सव्‍‌र्हिस ब्रेकची संधी मिळाली होती, मात्र त्याचा फायदा त्यांना घेता आला नाही. दहाव्या गेमच्या वेळी ग्रोएनफिल्ड व फराह यांना सव्‍‌र्हिस ब्रेकची संधी मिळाली होती, मात्र पेस व हिंगिस यांनी परतीचे फटके व सव्‍‌र्हिस याच्यावर नियंत्रण राखून हा सेट घेत सामना जिंकला.

पुरव राजा पराभूत
भारताच्या पुरव राजाचे पुरुष दुहेरीतील आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. लुकास क्युबोट (पोलंड) व अ‍ॅलेक्झांडर पेया (ऑस्ट्रिया) यांनी पुरव व क्रोएशियाचा इव्हो कालरेविक यांचा ६-१, ६-२ असा दणदणीत पराभव केला.

Story img Loader