लाल मातीचा राजा राफेल नदाल आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणारा नोव्हाक जोकोव्हिच यांनी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या मोहिमेचा विजयी श्रीगणेशा केला. या दोघांसह डेव्हिड फेरर आणि मारिन चिलीच यांनीही विजयी सलामी दिली. महिलांमध्ये पेट्रा क्विटोव्हा, कॅरोलिन वोझ्नियाकी यांनीही आपापल्या लढती जिंकल्या. व्हीनस विल्यम्स आणि युजेनी बोऊचार्ड यांना अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले.

क्ले कोर्टवरील दोन स्पर्धामध्ये जेतेपदापासून दुरावलेल्या नदालला यंदा सहावे मानांकन देण्यात आले आहे. मात्र या कशाचाही परिणाम जाणवू न देता नदालने बालेकिल्ल्यात फ्रान्सच्या क्विेनटिन हायल्सवर ६-३, ६-३, ६-४ असा विजय मिळवला. एक तास आणि ५० मिनिटांच्या लढतीत नदालने कारकीर्दीतील रोलँड गॅरोसमधील ६७व्या विजयाची नोंद केली. २८ वर्षीय नदालची उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचशी मुकाबला होण्याची शक्यता आहे. दुखापतींनी वेढलेल्या आणि खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या नदालला फ्रेंच खुल्या स्पर्धेचे दहावे जेतेपद मिळवता येणार नाही, अशा चर्चाना उधाण आले आहे. पहिल्या लढतीत हायल्सला निष्प्रभ करत नदालने सूर गवसल्याचे सिद्ध केले आहे.
कारकीर्दीत ग्रँडस्लॅम जेतेपदांचे वर्तुळ पूर्ण करण्यासाठी उत्सुक जोकोव्हिचने अनुभवी जार्को निइमिइनचा ६-२, ७-५, ६-२ असा पराभव करत दुसऱ्या फेरीत स्थान पटकावले. दुसऱ्या सेटमध्ये जोकोव्हिचला प्रचंड संघर्ष करावा लागला. मात्र सारा अनुभव पणाला लावत जोकोव्हिचने ३३ वर्षीय निइमिइनचे आव्हान संपुष्टात आले.
प्रदीर्घ काळ आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये असूनही ग्रँडस्लॅम जेतेपदापासून वंचित राहिलेल्या डेव्हिड फेररने विजयी सलामीसह क्ले कोर्टवरील ३००व्या विक्रमी विजयाची नोंद केली. ३३ वर्षीय आणि सातव्या मानांकित फेररने स्लोव्हाकियाच्या ल्युकास लाकोवर ६-१, ६-३, ६-१ असा विजय मिळवला. २०१३ मध्ये फेररला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
गेल्या वर्षी अमेरिकन खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या मारिन चिलीचने विजयासह यशस्वी पुनरागमन केले. दुखापतीमुळे चिलीचला ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत खेळता आले नव्हते. चिलीचने रॉबिन हासवर ६-२, ६-४, ६-२ अशी मात केली.
पहिल्यावहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या कॅरोलिन वोझ्नियाकीने इटलीच्या करीन नॅपचा ६-३, ६-० असा धुव्वा उडवत सहज विजय मिळवला. फ्रेंच खुल्या स्पर्धेत वोझ्नियाकीला उपांत्यपूर्व फेरीच्या पुढे अद्याप मजल मारता आलेली नाही. यंदा ही कामगिरी सुधारण्याचा वोझ्नियाकीचा प्रयत्न आहे. दुसऱ्या फेरीत वोझ्नियाकीचा मुकाबला जर्मनीच्या ज्युलिआ जॉर्ज्सशी होणार आहे.
चौथ्या मानांकित पेट्रा क्विटोव्हाने संघर्षमय लढतीत न्यूझीलंडच्या मारिना इराकोव्हिकचा ६-४, ३-६, ६-४ असा पराभव केला. इराकोव्हिकने सहा वेळा क्विटोव्हाची सव्‍‌र्हिस भेदली. क्विटोव्हाच्या हातून झालेल्या तब्बल ४७ टाळता येण्यासारख्या चुकांचा फटकाही तिला बसला. विम्बल्डन जेतेपद नावावर असणाऱ्या क्विटोव्हाला सलामीच्या लढतीतच विजयासाठी अडीच तास झुंज द्यावी लागली.
२००९ मध्ये फ्रेंच खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या स्वेतलाना कुझनेत्सोव्हाने नेदरलँड्सच्या किकी बर्टन्सला ६-१, ४-६, ६-२ असे नमवले. क्रिस्तिना लाडेनोव्हिकने युझेनी बोऊचार्डवर ६-४, ६-४ असा विजय मिळवला. स्लोअन स्टीफन्सने व्हीनस विल्यम्सला ७-६, ६-१ असे नमवत खळबळजनक विजयाची नोंद केली.
भूपती-कुर्गियास पराभूत
भारताच्या अनुभवी महेश भूपतीला फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या सलामीच्या लढतीतच पराभवाला सामोरे जावे लागले. मिश्र दुहेरीच्या लढतीत ल्युकास पौऊली आणि थानसाई कोकिनाकीस जोडीने भूपती-निक कुर्यिगास जोडीवर ६-३, ६-१ असा विजय मिळवला.

Story img Loader