लाल मातीचा शहेनशहा अशी बिरुदावली मिरवणाऱ्या स्पेनच्या राफेल नदालने जागतिक टेनिस महासंघाच्या अव्वल स्थानावर झेंडा रोवला आहे. तब्बल १०१ आठवडे अव्वल स्थानाचा मुकुट परिधान करणाऱ्या नोव्हाक जोकोव्हिच याला मागे टाकून नदाल आता अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. दुखापतींवर मात करून थाटात पुनरागमन केल्यानंतर १३ ग्रँड स्लॅम जेतेपदे नावावर असलेल्या नदालने दोन वर्षांनंतर प्रथमच पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. गेल्या वर्षी याच वेळी नदाल आपल्या गुडघ्यावर उपचार करवून घेत होता. पण १२ महिन्यांच्या कालावधीत नदालने अव्वल स्थानी पोहोचण्याची करामत केली.
नोव्हाक जोकोव्हिचवर सरशी साधण्यासाठी नदालला चीन खुल्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणे आवश्यक होते. शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात टॉमस बर्डिचने दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे नदालने आगेकूच केली. दुखापतीतून सावरल्यानंतर नदालने या मोसमातील हार्डकोर्टवरील स्पर्धा गाजवल्या.
नदालच्या अव्वल स्थानाची घोषणा सोमवारी होणार आहे. चीन खुल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत नदालची गाठ जोकोव्हिचशी पडण्याची शक्यता आहे. मात्र जोकोव्हिचने ही स्पर्धा जिंकली तरी अव्वल स्थानी पोहोचण्याइतपत पुरेसे गुण नदालने पटकावले आहेत. या मोसमात तो गुडघ्याच्या दुखापतीमुळे सात महत्त्वाच्या स्पर्धाना मुकला होता. फेब्रुवारीमध्ये कोर्टवर पुनरागमन केल्यानंतर नदालने फ्रेंच आणि अमेरिकन स्पर्धेचे ग्रँड स्लॅम पटकावण्याबरोबरच १० जेतेपद जिंकली. हार्डकोर्टवर नदालने एकही सामना गमावला नाही. या वर्षांतील त्याची हार्डकोर्टवरील कामगिरी २७-० अशी ठरली.
‘‘मोसमाअखेरीस जागतिक क्रमवारील अव्वल स्थानी पोहोचणे, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. पण अव्वल स्थानाचा काटेरी मुकुट कायम राखण्यासाठी मला बरेच सामने जिंकावे लागतील. कारकिर्दीतील हे संस्मरणीय वर्ष ठरले आहे. सहा महिने खेळूनही अव्वल स्थानी पोहोचल्याने मी आनंदी आहे,’’
राफेल नदालची जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानाला गवसणी
गेल्या काही वर्षांतील अव्वल स्थानासाठीची चुरस
खेळाडू         देश        कालावधी
रॉजर फेडरर    स्वित्र्झलड         २ फेब्रु. २००४-१७ ऑगस्ट ०८
राफेल नदाल    स्पेन                 १८ ऑगस्ट ०८-५ जुलै ०९
रॉजर फेडरर    स्वित्र्झलड         ६ जुलै ०९-६ जून १०
राफेल नदाल    स्पेन                 ७ जून १०-३ जुलै ११
नोव्हाक जोकोव्हिच    सर्बिया    ४ जुलै ११-८ जुलै १२
रॉजर फेडरर    स्वित्र्झलड        ९ जुलै १२-४ नोव्हेंबर १२
नोव्हाक जोकोव्हिच    सर्बिया        ५ नोव्हें. १२-४ ऑक्टो. १३
राफेल नदाल    स्पेन        ५ ऑक्टोबर २०१३