क्ले कोर्टवर ४९ वे जेतेपद पटकावण्याची संधी
दुखापत आणि अपयशाला मागे टाकून माँटे कार्लो मास्टर्स स्पध्रेचे जेतेपद पटकावत दोन वर्षांचा अजिंक्यपदाचा दुष्काळ संपवणाऱ्या राफेल नदालला अर्जेटिनाचे दिग्गज टेनिसपटू गिलेर्मो व्हिलेस यांचा विक्रम खुणावत आहे. बार्सिलोना खुल्या टेनिस स्पध्रेत जेतेपद पटकावून क्ले कोर्टवर ४९ जेतेपद पटकावणाऱ्या व्हिलेस यांच्या विक्रमाची बरोबरी करण्याचे लक्ष्य नदालने डोळ्यासमोर ठेवले आहे.
स्पेनच्या नदालने आठ वेळा बार्सिलोना खुल्या स्पध्रेत बाजी मारली आहे, परंतु मागील दोन वर्षांत त्याला निकोलस अल्माग्रो आणि फबिओ फॉग्निनी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. माँटे कार्लोचे जेतेपद हे नदालच्या कारकीर्दीतले २८वे मास्टर्स स्पध्रेतील जेतेपद आहे.
बार्सिलोना स्पध्रेत इटलीच्या फॉग्निनीचे आव्हान नदालसमोर असेल. फॉग्निनीने गेल्या दोन वर्षांत नदालला क्ले कोर्टवर दोनदा़, तर अमेरिकन खुल्या स्पध्रेतही नमवण्याचा पराक्रम गाजवला आहे. बार्सिलोना स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीत हे दोघेही एकमेकांसमोर येण्याची शक्यता आहे. उपांत्य फेरीत नदालला स्पेनच्याच डेव्हिड फेररचा सामना करावा लागेल.
गेल्या काही वर्षांत खडतर प्रवासाला मला सामोरे जावे लागले, परंतु यंदाच्या हंगामासाठी मी जोरदार तयारी केली आहे. माँटे कार्लो मास्टर्सचे जेतेपदामुळे पुढील काही स्पर्धामध्ये माझा आत्मविश्वास वाढण्यास मदत मिळेल, अशी आशा करतो.
– राफेल नदाल, आंतरराष्ट्रीय टेनिसपटू