‘लाल मातीचा सम्राट’ असे बिरूद लाभलेल्या राफेल नदाल याने अग्रमानांकित नोव्हाक जोकोव्हिच याचे फ्रेंच विजेतेपदाचे स्वप्न शुक्रवारी धुळीस मिळविले. साडेचार तासांच्या रोमहर्षक लढतीत त्याने ६-४, ३-६, ६-१, ६-७ (३-७), ९-७ असा विजय मिळवित अंतिम फेरी गाठली. गेल्यावर्षी अंतिम लढतीत नदालच्या हातून झालेल्या पराभवाची परतफेड जोकोव्हिच करणार काय, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. तथापि, क्ले कोर्टवर वर्चस्व गाजविणाऱ्या नदालच्या चतुरस्त्र खेळापुढे जोकोव्हिचला पराभव स्वीकारावा लागला.
पहिल्या सेटमध्ये नदालने फोरहँडच्या ताकदवान फटक्यांचा बहारदार खेळ करीत सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला. या ब्रेकच्या आधारे त्याने हा सेट ५१ मिनिटांमध्ये जिंकला. तथापि, जोकोव्हिचने दुसऱ्या सेटमध्ये सव्‍‌र्हिसवर नियंत्रण राखले. त्याने या सेटमध्ये नदालची सव्‍‌र्हिस भेदली. हा सेट जिंकत त्याने सामन्यात १-१ अशी बरोबरी केली. तिसऱ्या सेटमध्ये पुन्हा नदाल याने आक्रमक खेळ केला. त्याने दोन वेळा सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला. हा सेट त्याने केवळ ३७ मिनिटांमध्ये ६-१ असा सहज घेतला. चौथ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये संघर्षपूर्ण खेळ पहावयास मिळाला. दोन्ही खेळाडूंनी सव्‍‌र्हिस राखल्यानंतर टायब्रेकरचा उपयोग करण्यात आला. त्यामध्ये जोकोव्हिच याची सरशी झाली. त्याने टायब्रेकर ७-३ असा घेत हा सेट जिंकला. सामन्यात २-२ अशी बरोबरी झाल्यामुळे खेळातील रंगत अधिकच वाढत गेली. या स्पर्धेत शेवटच्या सेटमध्ये टायब्रेकरचा उपयोग केला जात नाही. तिसऱ्या गेममध्ये जोकोव्हिच याने सव्‍‌र्हिस ब्रेक मिळविला आणि २-१ अशी आघाडी मिळविली. जिगरबाज खेळाडू म्हणून ख्यातनाम असलेल्या नदालने २-४ अशा पिछाडीवरून ४-४ अशी बरोबरी साधली. त्याने आठव्या गेममध्ये सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला. ७-७ अशा बरोबरीनंतर नदालने आपली सव्‍‌र्हिस राखली. पाठोपाठ त्याने क्रॉसकोर्ट फटक्यांचा उपयोग करीत जोकोवीच याची सव्‍‌र्हिस तोडली आणि हा सेट ९-७ असा घेत अंतिम फेरी गाठली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा