माद्रिद : फ्रेंच खुल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी टेनिसपटू असलेल्या राफेल नदालला दुखापतीमुळे यंदा या स्पर्धेतून माघार घेणे भाग पडले आहे. तसेच त्याने पुढील वर्षी निवृत्तीचे संकेतही दिले आहे.
फ्रेंच खुल्या स्पर्धेवर नदालची मक्तेदारी असून त्याने तब्बल १४ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. तो या स्पर्धेचा गतविजेता आहे. ‘लाल मातीचा बादशाह’ अशी ओळख असलेल्या नदालला यंदा दुखापतीमुळे आपले जेतेपद राखण्याची संधी मिळणार नाही. नदालला या वर्षी जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत खेळताना दुखापत झाली होती. त्यातून तो अद्याप सावरू शकलेला नाही.
‘‘मला यंदा फ्रेंच खुल्या स्पर्धेत खेळता येणार नाही. ऑस्ट्रेलियात मला जी दुखापत झाली होती, त्यातून मी पूर्णपणे सावरलेलो नाही. गेले चार महिने माझ्यासाठी अवघड होते. करोनानंतर पुन्हा टेनिस सुरू झाल्यापासून मला तंदुरुस्ती प्राप्त करणे अवघड गेले आहे. त्यामुळे मी काही काळ टेनिसपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. मी महिन्याभराने पुनरागमन करेन किंवा मला चार महिनेही लागू शकतील. मी तारीख निश्चित केलेली नाही. मी शारिरीकदृष्टय़ा फार ताण घेणार नाही. पुढील वर्ष माझ्या कारकीर्दीतील अखेरचे वर्ष असेल,’’ असे २२ ग्रँडस्लॅम विजेता नदाल गुरुवारी म्हणाला. या वर्षांच्या अखेरीस होणाऱ्या डेव्हिस चषक स्पर्धेत खेळण्याची आशा असल्याचेही नदालने सांगितले.
फ्रेंच स्पर्धेच्या आयोजकांकडून संदेश
फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या आयोजकांनी समाजमाध्यमावरून नदालला खास संदेश पाठवला. ‘‘तुला हा निर्णय घेणे किती अवघड गेले असेल याची आम्ही कल्पनाही करू शकत नाही. यंदाच्या स्पर्धेत आम्हाला तुझी कमी जाणवेल. काळजी घे आणि टेनिस कोर्टवर दमदार पुनरागमन कर. पुढील वर्षी पॅरिसमध्ये तू खेळशील अशी आशा करतो,’’ असे फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या आयोजकांनी ‘ट्वीट’ केले.
दुखापतीमुळे किरियॉसही मुकणार
कॅनबेरा : पायाला झालेल्या दुखापतीमुळे निक किरियॉसने आगामी फ्रेंच खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. एका व्यक्तीने बंदुकीचा धाक दाखवत त्याच्या आईला धमकावले आणि त्याची गाडी चोरी केली. यादरम्यान आपल्या कुटुंबाला वाचवताना किरियॉसला दुखापत झाली. या चोरीनंतर एकाला कॅनबरा येथून अटक करण्यात आली. २६व्या मानांकित ऑस्ट्रेलियाच्या किरियॉसने कोर्टवरील सरावाला गेल्या तीन आठवडय़ांपासून सुरुवात केली आहे. मात्र, तो अजून दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही, असे किरियॉसचा व्यवस्थापक डॅनिएल हॉर्सफॉल म्हणाला. दुखापतीमुळेच किरियॉस डेन्मार्कच्या होल्गर रूनविरुद्धच्या प्रदर्शनीय सामन्यातही खेळू शकला नाही आणि फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतूनही त्याला माघार घ्यावी लागली. किरियॉसने गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून कोणतीच स्पर्धा खेळलेली नाही. तो २०१७ सालापासून फ्रेंच खुल्या स्पर्धेत खेळलेला नाही.