संघर्षपूर्ण लढतीत श्वार्ट्झमनवर सरशी; बेरेट्टिनीचा माँफिल्सला पराभवाचा धक्का
न्यूयॉर्क : ‘लाल मातीचा’ अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्पेनच्या राफेल नदालने हार्ड कोर्टवरही आपली जादू कायम राखली आहे. गुरुवारी नदालने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात अर्जेटिनाच्या दिएगो श्वार्ट्झमनला आठव्यांदा धूळ चारून कारकीर्दीत आठव्यांदा अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. तर इटलीच्या मॅटिओ बेरेट्टिनीने फ्रान्सच्या गेल माँफिल्सला पराभवाचा धक्का देऊन नदालविरुद्धच्या उपांत्य सामन्यातील स्थान पक्के केले.
जवळपास २ तास आणि ४६ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात जागतिक टेनिस क्रमवारीत दुसऱ्या स्थानी विराजमान असलेल्या दुसऱ्या मानांकित नदालने अर्जेटिनाच्या २०व्या मानांकित श्वार्ट्झमनला ६-४, ७-५, ६-२ असे पराभूत केले.
नदालने यावर्षी चारही ग्रँडस्लॅम स्पर्धाच्या किमान उपांत्य फेरीत प्रवेश केला असून फ्रान्स टेनिस स्पर्धेत त्याने विजेतेपद मिळवले. तर ऑस्ट्रेलियन आणि विम्बल्डन येथे त्याला अनुक्रमे अंतिम आणि उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. या सामन्यादरम्यान नदालच्या डाव्या हाताच्या मनगटाला दुखापतही झाली. परंतु त्याने हार न मानता दुखापतीवर उपचार करून सामना जिंकला. गतवर्षी हुआन मार्टिन डेल पोत्रोविरुद्धच्या उपांत्य लढतीत गुडघ्याच्या दुखापतीमुळेच नदालला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती.
बुधवारी मध्यरात्री झालेल्या अन्य उपांत्यपूर्व लढतीत २४व्या मानांकित बेरेट्टिनीने १३व्या मानांकित माँफिल्सला ३-६, ६-३, ६-२, ३-६, ७-६ (७-५) असे पाच सेटपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात नेस्तनाबूत करून धक्कादायक विजयाची नोंद केली. हा सामना तब्बल ३ तास आणि ५७ मिनिटे रंगला.
शनिवारी नदालविरुद्ध बेरेट्टिनीचा उपांत्य सामना रंगणार असून दुसऱ्या उपांत्य सामन्यात रॉजर फेडररला पराभूत करणारा ग्रिगोर दिमित्रोव्ह आणि पाचवा मानांकित डॅनिएल मेद्वेदेव यांची गाठ पडणार आहे. माँफिल्सच्या पराभवामुळे फ्रान्सच्या खेळाडूचे ग्रँडस्लॅम विजेतेपदाचे स्वप्न पुन्हा धुळीस मिळाले. यापूर्वी १९८३ म्हणजेच ३६ वर्षांपूर्वी यानिक नोह यांनी फ्रान्स टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळवले होते.
३३ कारकीर्दीत ३३व्यांदा कोणत्याही ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारा नदाल हा तिसरा टेनिसपटू ठरला आहे. त्याआधी रॉजर फेडरर (४५) व नोव्हाक जोकोव्हिच (३६) यांचा क्रमांक लागतो.
१ अमेरिकन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारणारा मॅटिओ बेरेट्टिनी हा इटलीचा गेल्या ४२ वर्षांतील पहिलाच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी इटलीच्या कोराडो बॅराझुट्टी यांनी १९७७मध्ये अशी कामगिरी केली होती.
सेरेना विरुद्ध स्विटोलिना; बेंकिक विरुद्ध आंद्रेस्कू
महिला एकेरीचा उपांत्य फेरीचा थरार शुक्रवारी सकाळी रंगणार असून यामध्ये कोण बाजी मारणार, याकडे टेनिसप्रेमी लक्ष ठेवून आहेत. कारकीर्दीतील २४व्या ग्रँडस्लॅमच्या दिशेने कूच करणाऱ्या अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सपुढे युक्रेनच्या पाचव्या मानांकित एलेना स्विटोलिनाचे आव्हान असणार आहे. दुसऱ्या उपांत्य लढतीत स्वित्र्झलडची १३वी मानांकित बेलिंडा बेंकिक आणि चेक प्रजासत्ताकची बियांका आंद्रेस्कू एकमेकींविरुद्ध उभ्या ठाकणार आहेत. बेंकिकनेच गतविजेत्या नाओमी ओसाकाला उपउपांत्यपूर्व फेरीत पराभूत केले होते.
कारकीर्दीतील सर्वोत्तम सामन्यांपैकी एक असा हा सामना होता आणि त्यामध्ये विजय मिळवल्याने मी फार समाधानी आहे. सध्या मला फक्त विजयी गुण आठवत असून त्यापूर्वी संपूर्ण सामन्यात मी कसा खेळ केला, हे खरंच लक्षात नाही.
– मॅटिओ बेरेट्टिनी
आणखी एका ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केल्यामुळे मी आनंदी आहे. या वर्षी मी चारही ग्रँडस्लॅममध्ये किमान उपांत्य फेरी गाठली. तूर्तास मी फक्त या विजयाचा आनंद लुटत असून शुक्रवारी मी उपांत्य सामन्याच्या तयारीला सुरुवात करणार आहे.
– राफेल नदाल