अव्वल दर्जाचे खेळाडू रॅफेल नदाल व सेरेना विल्यम्स यांनी चीन खुल्या टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक मारली. मात्र चीनची खेळाडू ली ना तसेच डेव्हिड फेरर यांना पराभवाचा धक्का बसला.
जिगरबाज खेळाडू म्हणून ख्याती असलेल्या नदाल याने नावलौकिकास साजेसा खेळ करीत इटलीच्या फॅबिओ फॉगनिनी याच्यावर २-६, ६-४, ६-१ असा विजय मिळविला. दुसऱ्या सेटमध्ये १-४ अशा पिछाडीवरून त्याने सलग पाच गेम्स घेत पराभव वाचविला. रिचर्ड गास्केट याने अनुभवी खेळाडू डेव्हिड फेरर याच्यावर ६-३, ६-४ असा खळबळजनक विजय नोंदविला. टॉमस बर्डीच याने जॉन इस्नेर याचे आव्हान ७-५, ६-२ असे संपुष्टात आणले आणि उपांत्य फेरीत स्थान मिळविले. अमेरिकन विजेती सेरेना हिला कॅरोलिन वोझ्नियाकीविरुद्ध ६-१, ६-४ असा सरळ दोन सेट्समध्ये विजय मिळाला. नवव्या मानांकित पेत्रा क्विटोवा हिने चौथ्या मानांकित ली ना हिची घोडदौड ४-६, ६-२, ६-४ अशी रोखली. येलेना यांकोवीच हिने उपांत्य फेरीत स्थान मिळविताना ल्युसी साफारोव्हा हिच्यावर ६-७ (३-७), ६-४, ६-४ असा संघर्षपूर्ण विजय नोंदविला.
 नदालच्या चुकांचा फायदा घेत फॅबिओ याने पहिला सेट घेतला. त्याने फोरहँडच्या ताकदवान फटक्यांचा उपयोग करीत दोन वेळा सव्‍‌र्हिस ब्रेक मिळविला. दुसऱ्या सेटमध्येही त्याने सव्‍‌र्हिसब्रेक मिळवित ४-१ अशी आघाडी घेतली होती. त्यावेळी आश्चर्यजनक विजय नोंदविला जाणार असेच चिन्ह होते मात्र नदाल हा कोणत्याही क्षणी सामन्यास कलाटणी देण्याबाबत ख्यातनाम आहे. त्याचाच प्रत्यय त्याने घडवित सामन्यावर पकड मिळविली. सलग पाच गेम्स घेताना त्याने दोन वेळा सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला. हा सेट घेतल्यानंतर त्याने प्रतिस्पध्र्याला फारशी संधी दिली नाही.

दुहेरीत सानिया-ब्लॅक यांची आगेकूच

बीजिंग : भारताची सानिया मिर्झा हिने महिलांच्या दुहेरीत आव्हान राखले. तिने कॅरा ब्लेक हिच्या साथीत उपांत्य फेरीत स्थान मिळविले. त्यांनी सारा इराणी व रॉबर्टा व्हिन्सी या इटालीयन जोडीचा ६-४, ६-४ असा पराभव केला. त्यांनी दोन्ही सेट्समध्ये पासिंग शॉट्सचा बहारदार खेळ केला तसेच अचूक सव्‍‌र्हिसचा उपयोग केला. सानियाने यंदाच्या मोसमात आतापर्यंत चार स्पर्धामध्ये दुहेरीत अजिंक्यपद मिळविले आहे.