फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या लाल मातीवरचे आपले प्रभुत्व सिद्ध करत राफेल नदालने लागोपाठ दुसऱ्या दिवशीही विजय मिळवला. नदालने इटलीच्या फॅबिओ फॉगिनिनीवर ७-६ (५), ६-४, ६-४ असा विजय मिळवला. व्हिक्टोरिया अझारेन्काला कडव्या संघर्षांला सामोरे जावे लागले तरी रशियाच्या मारिया शारापोव्हाने सहज विजय मिळवत आगेकूच केली.
अझारेन्काने अलिझ कॉर्नेटवर संघर्षपूर्ण विजय मिळवत तर शारापोव्हाने झेंग जिला नमवत चौथी फेरी गाठली. अझारेन्काला विजयासाठी संघर्ष करावा लागला. अझारेन्काने फ्रान्सच्याच कॉर्नेटचा ४-६, ६-३, ६-१ असा पराभव करत चौथ्या फेरीत मजल मारली. शारापोव्हाने चीनच्या झेंगला ६-१, ७-५ असे पराभूत केले.
पुरुषांमध्ये जपानच्या केई निशिकोरीने अंतिम सोळात धडक मारली. निशिकोरीने फ्रान्सच्या बेनाइट पेअरला ६-३, ६-७ (३), ६-४, ६-१ असे नमवत चौथी फेरी गाठली.रिचर्ड गॅसक्वेटने निकोलाय डेव्हडेन्कोचा ६-४, ६-३, ६-३ असा धुव्वा उडवला.
भारतीय टेनिसपटूंसाठी पराभवाचा दिवस
भारतीय टेनिसपटूंसाठी स्पर्धेतील शनिवारचा दिवस अपयशी ठरला. लिएण्डर पेस व त्याचा ऑस्ट्रियाचा साथीदार जर्गेन मेल्झर यांना दुसऱ्या फेरीत उरुग्वेच्या पाब्लो क्युवेअस आणि अर्जेटिनाच्या होरासिओ झेबालोस जोडीने पेस-मेल्झर जोडीकडून ५-७, ६-४, ७-६ (६) असे पराभूत व्हावे लागले. महेश भूपती आणि त्याची साथीदार केसये डेलाक्युआ जोडीचे आव्हान सलामीच्या सामन्यात मेक्सिकोच्या सँटियागो गोन्झालेझ आणि ऑस्ट्रेलियाच्या अॅनास्टासिया रोडिओनोव्हा जोडीने ६-४, १-६, ११-९ असे संपुष्टात आणले. रोहन बोपण्णा-अॅशलेह बार्टी जोडीला ल्युसी राडेका-फ्रान्टिसेक सरमाक जोडीने ६-४, ६-४ असे हरवले.