भारताचा ड्रॅगफ्लिकर व्ही.आर.रघुनाथ हा आगामी हॉकी इंडिया लीगमध्ये डच खेळाडू टय़ुन डी नुईजीर याच्याकडून हॉकीचे डावपेच शिकण्यासाठी उत्सुक झाला आहे.  हे दोन्ही खेळाडू उत्तरप्रदेश विझार्ड्स संघाकडून खेळणार आहेत. हॉकी इंडिया लीगकरिता झालेल्या खेळाडूंचे लिलावात रघुनाथ याला ७६ हजार डॉलर्सची बोली लावून उत्तरप्रदेशने विकत घेतले आहे. ही स्पर्धा १४ जानेवारीपासून सुरु होत आहे. नुईजीर याने तीन वेळा आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचा सवरेत्कृष्ट खेळाडू पुरस्कार मिळविला आहे. हॉकी इंडिया लीगसाठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून त्याची ऑस्ट्रेलियाचा जेमी डायर व भारताचा कर्णधार सरदारासिंग यांच्यासमवेत नियुक्ती करण्यात आली आहे.
नुईजीरबरोबर खेळण्याची संधी मिळणे हे माझे स्वप्न साकार होणार आहे. तो अतिशय अनुभवी खेळाडू असल्यामुळे खेळावर नियंत्रण मिळविण्याबाबत तो माहीर मानला जातो. खेळावर हुकमत कशी मिळवायची हे तंत्र मी त्याच्याकडून शिकणार आहे. त्याखेरीज बरेच काही त्याच्याकडून शिकता येईल, असे रघुनाथ याने सांगितले. तो पुढे म्हणाला, खरं तर मला एक लाख डॉलर्सची बोली मिळेल अशी माझी अपेक्षा होती तथापि आहे त्या बोलीवर मी समाधानी आहे. मी केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळेच मला चांगली कमाई होणार आहे.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा