Rahkeem Cornwall hits century with 12 sixes watch Video: जगातील सर्वात वजनदार क्रिकेटपटूने सोमवारी आपल्या टी-२० कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. कॅरेबियन प्रीमियर लीगचे सामने सध्या वेस्ट इंडिजमध्ये खेळले जात आहेत. टी-२० लीगच्या चालू हंगामातील १८ व्या सामन्यात बार्बाडोस रॉयल्सने सेंट किट्स आणि नेव्हिस पॅट्रियट्सचा ८ गडी राखून पराभव केला. या सामन्यात दोन्ही संघांनी २०० हून अधिक धावा केल्या. बार्बाडोसचा संघ हा आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सचाच संघ आहे.
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन आहे. म्हणजे कॉर्नवॉल आणि संजू एकाच फ्रँचायझीसाठी खेळतात. या सामन्यात सेंट किट्स संघाने प्रथम खेळताना ४ गडी २२० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात १४० किलो रहकीम कॉर्नवॉलने १२ षटकारांसह केवळ आपले शतक पूर्ण केले नाही, तर संघाला विजयापर्यंत नेले. त्यामुळे बार्बाडोस रॉयल्सने १८.१ षटकांत २ गडी राखून लक्ष्य गाठले.
लक्ष्याचा पाठलाग करताना बार्बाडोस रॉयल्सच्या संघाला रहकीम कॉर्नवॉल आणि काइल मेयर्स यांनी दमदार सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ४ षटकांत ४१ धावा जोडल्या. मेयर्स १३ चेंडूत २२ धावा करून बाद झाला. त्याने ५ चौकार मारले. यानंतर कॉर्नवॉल आणि लॉरी इव्हान्स यांनी अर्धशतकी भागीदारी करत धावसंख्या १२० धावांच्या पुढे नेली. इव्हान्स १४ चेंडूत २४ धावा करून बाद झाला. त्याने २ चौकार आणि २ षटकार मारले. यानंतर कॉर्नवॉलने आपल्या टी-२० कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले.
हेही वाचा – AUS vs SA: मिचेल मार्शने केला धमाका! १८० हून अधिकच्या स्ट्राइक रेटने धावा करत मोडला कोहलीचा ‘विराट’ विक्रम
४५ चेंडूत पूर्ण केले शतक –
३० वर्षीय रहकीम कॉर्नवॉलने ४५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने ४ चौकार आणि १२ षटकार मारले. यानंतर तो रिटायर्ड हर्ट झाला. या डावात कॉर्नवॉलने २१३ च्या स्ट्राईक रेटने ४८ चेंडूत १०२ धावा केल्या. कर्णधार रोव्हमन पॉवेलनेही शानदार खेळी केली. तो २६ चेंडूत ४९ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. यावेळी त्याचा स्ट्राइक रेट १८८ होता. ज्यामध्ये त्याने ५ चौकार आणि ३ षटकार मारले. अलिक अथनाजेही १० चेंडूत १३ धावा करून नाबाद राहिला. अथनाजेने चौकार मारून विजय मिळवून दिला. संघाने १८.१ षटकात २२३ धावा करत सामना जिंकला. म्हणजे अजून ११ चेंडू शिल्लक होते.
सेंट किट्सकडून तीन अर्धशतके झळकली –
यापूर्वी सेंट किट्सकडून तीन फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. सलामीवीर फलंदाज आंद्रे फ्लेचरने ३७ चेंडूत ५६ धावा केल्या. त्याने ७ चौकार आणि १ षटकार मारला. विल स्मिडने ३६ चेंडूत ६३ धावा केल्या, तर कर्णधार शेफरन रदरफोर्डने २७ चेंडूत ६५ धावा करून नाबाद राहिला. रदरफोर्डने २४१ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. त्याने ५ चौकार आणि ५ षटकार मारले. या सामन्यात एकूण २७ षटकार मारले गेले. सेंट किट्सने १० आणि बार्बाडोस रॉयल्सच्या फलंदाजांनी १७ षटकार ठोकले. ऑफस्पिनर कॉर्नवॉलनेही या सामन्यात २ बळी घेतले.