Rahkeem Cornwall runout: क्रिकेट हा एक शारीरिक, अंगमेहनतीचा खेळ आहे आणि त्यासाठी भरपूर फिटनेस आवश्यक आहे. मात्र याला अपवाद म्हणून बघायचे झाल्यास वेस्ट इंडिजचा १४३ किलो वजन असणारा खेळाडू रहकीम कॉर्नवॉल आहे, जो सतत क्रिकेट खेळत असतो. गोलंदाजीत त्याची कामगिरी तशी चांगली आहे. पण याव्यतिरिक्त त्याला सर्वत्र म्हणजेच मुख्यत फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करताना संघर्ष करावा लागतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा तो जगातील सर्वात वजनदार खेळाडू आहे. याबरोबरच कॉर्नवॉलला जगातील सर्वात अनफिट क्रिकेटरचा टॅगही मिळाला आहे.
रहकीम कॉर्नवॉल विचित्र पद्धतीने धावबाद झाला
रहकीम कॉर्नवॉल हा वजन जास्त असल्यामुळे नीट धावू शकत नाही. कधीकधी हे कसोटीत या गोष्टीचा फारसा फरक पडत नाही पण, टी२० क्रिकेटमध्ये तसे करून चालत नाही. येथे चौकार रोखण्यापासून धावा चोरण्यापर्यंत वेगाने धावावे लागते. ३० वर्षांचा रहकीम कॉर्नवॉल, कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये बार्बाडोस रॉयल्सकडून खेळत आहे. सेंट लुसिया किंग्जविरुद्धच्या सामन्यात तो अशा पद्धतीने रनआऊट झाला की, सगळ्यांनाच हसू अनावर झाले.
त्याच्या धावण्याच्या पद्धतीवर समालोचकही हसले
सलामीला उतरलेल्या कॉर्नवॉलने पहिला चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने खेळला. तिथे क्षेत्ररक्षण करताना ख्रिस सोलच्या हातातून चेंडू थोडासा निसटला. यादरम्यान कॉर्नवॉल आणि काइल मेयर्स यांनी धाव घेण्याचा निर्णय घेतला. क्षेत्ररक्षकाने चेंडू उचलला आणि विकेटच्या दिशेने फेकला. पण जोरात पळून धाव काढता न आल्याने कॉर्नवॉल क्रीजपासून दूरच राहिला. धावा काढण्यासाठी तो जॉगिंगला जसं धावतात तसं तो धावत होता. यावर समालोचकही हसले. कॉर्नवॉल अर्ध्या रस्त्यावर होता तेव्हाच दुसऱ्या बाजूला मिअर्स फलंदाजीच्या दुसऱ्या टोकाला पोहोचला होता. त्याच दरम्यान तो धावबाद झाला.
रॉयल्सचा पराभव झाला
सेंट लुसिया किंग्सविरुद्धच्या या सामन्यात बार्बाडोस रॉयल्सचा ५४ धावांनी पराभव झाला. प्रथम फलंदाजी करताना किंग्जने ६ गडी गमावून २०१ धावा केल्या. शॉन विल्यम्सने ३० चेंडूत ४७ तर कर्णधार फाफ डू प्लेसिसने ३२ चेंडूत ४६ धावा केल्या. जेसन होल्डरने ४ विकेट्स घेतल्या. रॉयल्सचा डाव १४७ धावांवर आटोपला. न्यम यंगने ४८ धावांचे योगदान दिले. मॅथ्यू फोर्डने ३ विकेट्स घेतल्या.