Rahmanullah Gurbaz broke MS Dhoni’s record: अफगाणिस्तानचा संघ पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना हरला असला, तरी अफगाणिस्तानने संघाने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली. या सामन्यात रहमानुल्ला गुरबाजने वादळी शतक झळकावले. या शतकाच्या जोरावर गुरबाजने महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडला.
अफगाणिस्तानचे सलामीवीर रहमानुल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी ३९.५ षटकांत फलंदाजी करत पहिल्या विकेटसाठी २२७ धावा जोडल्या. २१ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज गुरबाजने १५१ चेंडूत विक्रमी १५१ धावा केल्या. या खेळीत त्याने अनेक विक्रम मोडीत काढले. त्यापैकी एक विक्रम एमएस धोनीचा होता.
याआधी इतर कोणत्याही यष्टिरक्षक फलंदाजाने पाकिस्तानविरुद्ध १५० धावांचा टप्पा गाठला नव्हता. महेंद्रसिंग धोनीने यापूर्वी २००५ मध्ये विशाखापट्टणम येथे पाकिस्तानविरुद्ध यष्टिरक्षक म्हणून १४८ धावांची खेळी केली होती. पाकिस्तानविरुद्धच्या वनडेमध्ये कोणत्याही यष्टीरक्षक फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या होती, जी आता अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूने १८ वर्षांनंतर मागे टाकली आहे. एकूणच, पाकिस्तानविरुद्धची एकदिवसीय क्रिकेटमधील ही सहावी सर्वोच्च धावसंख्या आहे.
हेही वाचा – Asia Cup 2023: “तुम्हाला सिराजलाच…”, शार्दुल ठाकुर आणि प्रसिद्ध कृष्णाबद्दल आकाश चोप्राचे मोठं वक्तव्य
पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या –
विराट कोहली (भारत) – १८३
डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) – १७९
अॅलेक्स हेल्स (इंग्लंड)- १७१
ब्रायन लारा (वेस्ट इंडिज)- १५६
आरोन फिंच (ऑस्ट्रेलिया) – १५३
रहमानउल्ला गुरबाज (अफगाणिस्तान) – १५१
रहमानुल्ला गुरबाजची खेळी ठरली व्यर्थ –
रहमानुल्ला गुरबाजने उत्कृष्ट खेळी खेळली आणि संघाची धावसंख्या ३०० पर्यंत नेली, परंतु त्याची खेळी व्यर्थ गेली. या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघाने ५० षटकांत ५ गडी गमावून ३०० धावा केल्या. यादरम्यान रहमानउल्ला गुरबाजने अफगाणिस्तानसाठी १५१ धावांची विक्रमी खेळी खेळली. अफगाणिस्तान संघाने पाकिस्तानविरुद्ध केलेली ही सर्वोच्च धावसंख्या होती.
हेही वाचा – AFG vs PAK: मांकडिंगवरून पेटला पुन्हा वाद, फजलहक फारुकीने शादाब खानला केले आऊट, पाहा VIDEO
यापूर्वी त्यांनी आजपर्यंत २६० धावांचा टप्पाही पार केला नव्हता. प्रत्युत्तरात बाबरच्या ५३, इमाम-उल-हकच्या ९१ आणि शादाब खानच्या ३५ चेंडूंत ४८ धावांच्या जोरावर पाकिस्तानने ४९.५ षटकांत १ गडी राखून विजय मिळवला. आशिया चषक २०२२ प्रमाणे, पुन्हा एकदा शेवटच्या षटकात नसीम शाहने पाकिस्तानला अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवून देऊन वर्षभरापूर्वीच्या आठवणी ताज्या केल्या.