राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा

उत्तर प्रदेशातील गोंडा येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेमध्ये अमित धानकरने ७४ किलो वजनी गटात पुन्हा एकदा विजेतेपद पटकावले. राष्ट्रीय फ्रीस्टाईल कुस्तीमधील हे त्याचे सातवे विजेतेपद ठरले. रेल्वेच्या राहुल आवारेने ६१ किलो वजनी गटात गोव्याच्या अभिमन्यू यादवला पराभूत करून विजेतेपद पटकावले.

आशियाई आणि राष्ट्रकुलमध्ये पदकप्राप्त धानकरने त्याच्या भक्कम संरक्षणाला आक्रमणाची जोड देत विनोदकुमारवर ५-१ अशी मात केली. धानकरच्या वजनी श्रेणीत नेहमी योगेश्वर दत्तचा समावेश असल्याने त्याला आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये फारशी संधीच मिळू शकली नाही. सध्यादेखील त्याच्या वजनी गटात दोन वेळचा ऑलिम्पिक विजेता सुशील कुमार याचे आव्हान आहे. या विजेतेपदानंतर धानकरने त्याच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले. ‘‘मला माझ्या बचावावर पूर्ण भरवसा आहे. सुशील कुमार यांच्याकडूनदेखील मी अनेकदा मार्गदर्शन घेत आलो आहे. येत्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत मला त्यांच्याऐवजी संधी मिळू शकेल,’’ असेही धानकर याने सांगितले.

दरम्यान, राहुल आवारेने ६१ किलो वजनी गटात गोव्याच्या अभिमन्यू यादववर वर्चस्व गाजवीत जेतेपदाला गवसणी घातली. आवारेने अभिमन्यूच्या डाव्या पायाची पकड घेत प्रारंभी दोन गुण घेतले. त्यानंतर त्याने मोळी डावावर सलग आठ गुण घेत निर्विवाद वर्चस्वासह विजेतेपदावर पुन्हा एकदा हक्क प्रस्थापित केला.

अन्य वजनी गटांपैकी ८६ किलो गटात परवीनने त्याच्या उंचीचा फायदा घेत पवनकुमारवर बाजी पलटवत सुवर्णपदक मिळवले. ६५ किलो वजनी गटात भारतीय हवाई दलाच्या हरफुल गुलियाने हरयाणाच्या परवीनवर मात केली. तर ९७ किलो वजनी गटात हरयाणाच्या मौसम खत्रीने सत्यव्रत कादियानवर विजय मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरले. सांघिक कामगिरीत रेल्वेच्या संघाने १६३ गुणांसह बाजी मारली.

Story img Loader