कबड्डी खेळात हात-पाय मोडतील. हा खेळ सोड. अभ्यासाकडे लक्ष दे, हे बोल ऐकवत माझ्या पोलीस दलातील वडिलांनी मला बऱ्याचदा चोप दिला होता. पण आता कबड्डीने दिलेले मोठेपण पाहून त्यांना माझा अभिमान वाटतो, असे तेलुगू टायटन्सचा हुकमी चढाईपटू राहुल चौधरीने सांगितले. एअर इंडियात नोकरी करणाऱ्या राहुलने प्रो कबड्डी लीगच्या पहिल्या हंगामात चढायांचे एकंदर १२५ गुण कमवत सर्वोत्तम चढाईपटूचा पुरस्कार पटकावला होता. आता १८ जुलैपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या हंगामाला सामोरे जाताना राहुल तेलुगू टायटन्सला विजेतेपद मिळवून देण्यासाठी उत्सुक आहे.
कबड्डी खेळाची आवड कशी निर्माण झाली, हे सांगताना भूतकाळ राहुलच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. ‘‘माझे वडील पोलीस दलात नोकरी करायचे. कबड्डी खेळून तू काय दिवे लावणार, असे खडे बोल सुनावत वडिलांनी मला अनेकदा चोपले होते. त्या वेळी मला स्वत:लाही ठाऊक नव्हते की, कबड्डी एक दिवस आपल्याला हे भाग्याचे क्षण आयुष्यात आणेल. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर सेनादलात सहभागी होता येईल, या इराद्याने मी धावण्याचा चांगला सराव करायचो. परंतु गांधीनगरच्या कबड्डी प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालो आणि तिथे यशस्वी ठरलो. मग धावण्याची जागा माझ्या आयुष्यात कबड्डीने घेतली. मग तिथेच माझा कबड्डीपटू म्हणून घडण्याचा प्रवास सुरू झाला. सुरुवातीच्या दिवसांत मी चांगला क्षेत्ररक्षक होतो, परंतु भारतीय संघाच्या शिबिरात मला माझ्या प्रशिक्षकांनी चढाईवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे माझ्या यशाचे श्रेय त्यांनाच जाते.’’
प्रो कबड्डीच्या प्रवासाबाबत राहुल म्हणाला, ‘‘प्रो कबड्डी लीग सुरू झाल्यापासून मी एक स्वप्नच जगतोय असे वाटते आहे. हे सारे काही अविश्वसनीय आहे. राहुल चौधरी हा आमचा आवडता कबड्डीपटू आहे, हे जेव्हा मी कुणाकडून ऐकतो, तेव्हा स्वत:विषयीचा आदर वाढतो. एअर इंडियाचा कर्मचारी म्हणून किंवा खेळासाठी कुठे हवाई प्रवास करायला निघालो की कुणीही आधी मला ओळखत नव्हते, परंतु आता प्रो कबड्डीने आम्हाला मोठी ओळख दिली आहे. छायाचित्र काढण्यासाठी वगैरे बरेच जण उत्सुक असतात.’’
तो पुढे म्हणाला, ‘‘प्रो कबड्डी आधी आणि नंतरच्या वातावरणात जमीन-अस्मानाचे अंतर आहे. आधी मोजके खेळाडू खेळताना दिसायचे, मात्र आता बऱ्याच संख्येने खेळाडू खेळतात.’’
तेलुगू टायटन्सच्या तयारीविषयी राहुल म्हणाला, ‘‘मागील हंगामात आमच्याकडून ज्या काही छोटय़ा-छोटय़ा चुका झाल्या होत्या, ज्यामुळे आमचे आव्हान संपुष्टात आले होते. त्यात आम्ही सुधारणा केली. आमच्यातील उणिवांवर मात करून येत्या हंगामासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. अनेक सराव शिबिरे झाली आहेत. तंदुरुस्ती शिबिराचाही चांगला फायदा झाला आहे.’’
प्रो कबड्डीमधील चढाईला बंधन असते. हे तंत्र कसे अवगत केले, या प्रश्नाला उत्तर देताना राहुलने सांगितले, ‘‘३० सेकंद ‘कबड्डी.. कबड्डी..’ असा उच्चार करीत चढाई करणे ही सर्वसामान्य प्रक्रिया आहे, परंतु हा उच्चार बऱ्याचदा पंचांना ऐकू न गेल्यामुळे मला काही वेळा बादसुद्धा देण्यात आले आहे किंवा आवाज मोठय़ाने येऊ दे असे सांगण्यात आले.’’
राहुल हा उत्तर प्रदेशच्या बिजनोर गावचा. खेळामुळे आधी बारावीपर्यंत शिक्षण झाले होते, परंतु आता पुन्हा त्याने शिक्षण पूर्ण करण्याचे ठरवले असून, तो कला शाखेच्या द्वितीय वर्षांत शिकत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा