भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भात माहिती दिली. दरम्यान, बीसीसीआयने कोचिंग स्टाफसाठी अर्ज मागवले होते. हे वृत येईपर्यंत भारतीय क्रिकेट संघाच्या पुढील मुख्य प्रशिक्षकाची चर्चा अजूनही थांबलेली नव्हती. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने केलेल्या वक्तव्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले होते. ”द्रविडने वेळ मागितला आहे, जेणेकरून तो टीम इंडियाचा प्रशिक्षक बनू इच्छितो की नाही याचा विचार करू शकेल. राहुलने अद्याप या प्रकरणावर स्पष्ट मत दिलेले नाही”, असे गांगुलीने यापूर्वी सांगितले होते.

एएनआयच्या वृत्तानुसार, ”द्रविडने मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. व्ही.व्ही. एस लक्ष्मण राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) द्रविडची जागा घेऊ शकतो.” सध्या द्रविड एनसीएचा प्रमुख आहे. काही दिवसांपूर्वी द्रविडचे सहकारी पारस म्हाम्ब्रे यांनी भारतीय संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला. टी-२० विश्वचषकानंतर रवी शास्त्री भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सोडणार आहेत. त्यानंतर बीसीसीआयसाठी द्रविड हा आवडता पर्याय होता. दुबईत सपन्न झालेल्या आयपीएलदरम्यान बीसीसीआय सचिव जय शाह आणि गांगुली यांनी द्रविडसोबत चर्चा केली होती.

हेही वाचा – IND vs PAK : ‘‘तू त्याला घेऊन चूक केलीस”, पाकिस्तानच्या इंझमामचे विराटच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह!

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुल व्यतिरिक्त, बीसीसीआयने टीमसोबत मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्या अनिल कुंबळे, रिकी पाँटिंग, व्हीव्हीएस यांच्यासह काही इतर लोकांशी संपर्क साधला होता. सुरुवातीला कुंबळेचे नाव आधी पुढे आले, पण नंतर त्याचे नाव शर्यतीतून बाहेर पडले. राहुल द्रविडचे नाव आठवडाभराहून अधिक काळ निश्चित असल्याचे मानले जात होते.

४८ वर्षीय द्रविड सध्या बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे काम पाहत असून यापूर्वीही त्याने श्रीलंकेच्या दौऱ्यावर प्रशिक्षक म्हणून काम केल आहे. द्रविड १९ वर्षांखालील संघ आणि भारत अ संघाला प्रशिक्षणही देत आहे. अशाप्रकारे द्रविडला मुख्य संघाला प्रशिक्षण देण्यासाठी विचारणा झाल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. मात्र द्रविडने तरुणांना क्रिकेटचे धडे देण्याला आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे काम पाहण्याला प्राधान्य दिले आहे. यापूर्वी द्रविडने २०१६ आणि २०१७ साली अशाच पद्धतीची ऑफर नाकारली होती.

Story img Loader