भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड यांच्याकडे भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बीसीसीआयने ट्वीट करून याबाबतची घोषणा केली आहे.४८ वर्षीय द्रविड सध्या बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे काम पाहत असून यापूर्वीही त्याने श्रीलंकेच्या दौऱ्यावर प्रशिक्षक म्हणून काम केल आहे. द्रविड १९ वर्षांखालील संघ आणि भारत अ संघाला प्रशिक्षणही देत आहे. अशाप्रकारे द्रविडला मुख्य संघाला प्रशिक्षण देण्यासाठी विचारणा झाल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. मात्र द्रविडने तरुणांना क्रिकेटचे धडे देण्याला आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे काम पाहण्याला प्राधान्य दिले आहे. यापूर्वी द्रविडने २०१६ आणि २०१७ साली अशाच पद्धतीची ऑफर नाकारली होती.
राहुल व्यतिरिक्त, बीसीसीआयने टीमसोबत मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्या अनिल कुंबळे, रिकी पाँटिंग, व्हीव्हीएस यांच्यासह काही इतर लोकांशी संपर्क साधला होता. सुरुवातीला कुंबळेचे नाव आधी पुढे आले, पण नंतर त्याचे नाव शर्यतीतून बाहेर पडले. “टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षकपदी वर्णी लागल्याचा अभिमान वाटत आहे. रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने चांगली कामगिरी केली आहे. हे कार्य पुढे घेऊन जाणार आहे. मी काही खेळाडूंसोबत इंडिया ए, अंडर-१९ आणि एनसीएमध्ये काम केलं आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्यास आनंद वाटेल. पुढच्या दोन वर्षात मोठ्या स्पर्धा आहेत. सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसोबत मिळून ध्येय गाठण्याचा प्रयत्न करू”, असं राहुल द्रविडने सांगितलं आहे.
टी २० वर्ल्डकपनंतर रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यानंतर टीम इंडियाला राहुल द्रविडचं मार्गदर्शन लाभणार आह. भारत न्यूझीलंड मालिकेदरम्यान राहुल द्रविड आपल्या कामाला सुरुवात करणार आहे. राहुल द्रविड २०२३ पर्यंत संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. दुसरीकडे पारस म्हाम्ब्रे यांना गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलं आहे. राहुल द्रविड एकूण १६४ कसोटी सामने खेळला असून १३,२८८ धावा आणि ३६ शतकं ठोकली आहेत. तर ३४४ एकदिवसीय सामने खेळला असून १०,८८९ धावांसह १२ शतकं ठोकली आहेत. राहुल द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अनेक भूमिका बजावल्या आहेत. राजस्थान रॉयल्ससोबत खेळाडू आणि प्रशिक्षकाची भूमिका बजावली आहे. तर इंडिया ए, एनसीएसोबत काम केलं आहे. टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर असताना राहुल द्रविडने प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं.