आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ च्या समाप्तीनंतर भारतीय क्रिकेट संघात अनेक गोष्टी बदलणार आहेत. राहुल द्रविड नवीन मुख्य प्रशिक्षक असेल आणि लोकांना खेळाच्या टी-२० फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्व करणारा एक नवीन चेहरा दिसेल. विराट कोहलीने यापूर्वीच टी-२० विश्वचषकानंतर आपल्या पदावरून पायउतार होणार असल्याचे जाहीर केले होते. आता काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, द्रविडने रोहितला व्हाईट-बॉल फॉरमॅटमध्ये कर्णधारपदासाठी आपली पहिली पसंती असल्याचे सांगितले.

असे मानले जाते की जर टीम इंडिया टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचू शकली नाही, तर विराटकडून ५० ओव्हरच्या फॉरमॅटचेही कर्णधारपद काढून घेतले जाऊ शकते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बुधवारी नवीन मुख्य प्रशिक्षकाविषयीच्या सर्व अटकळांना पूर्णविराम दिला, परंतु अद्याप कोहलीचा उत्तराधिकारी निवडलेला नाही. अनेक क्रिकेट तज्ञांनी रोहित शर्मा, तर काहींनी केएल राहुल आणि ऋषभ पंत यांची नावे कप्तानपदासाठी सुचवली आहेत.

हेही वाचा – द्रविड बनला भारताचा नवा ‘महागुरू’; खास मित्र सेहवाग म्हणतो, “आता खेळाडूंना विश्वास…”

द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने एका मुलाखतीत रोहितला टी-२० आंतरराष्ट्रीय कर्णधारपदासाठी आपली पहिली पसंती असल्याचे सांगितले. रोहितनंतर त्याने केएल राहुलचे नाव घेतले. रोहित शर्माने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये एक यशस्वी कर्णधार म्हणून आपली क्षमता सिद्ध केली, जिथे त्याने मुंबई इंडियन्सला विक्रमी पाच विजेतेपदे मिळवून दिली. टीम इंडियासाठी त्याच्या कर्णधारपदाच्या विक्रमांमध्ये निदाहास ट्रॉफी आणि आशिया कप २०१८ च्या विजयाचा समावेश आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी मायदेशातील मालिकेत हिटमॅनला संघाचे नेतृत्व मिळू शकते. १७ नोव्हेंबरपासून भारताच्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेला सुरुवात होत आहे.