Rahul Dravid Bowling Video: भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षणाखाली भारताने टी-२० विश्वचषक २०२४ चे जेतेपद पटकावले. २०२४ च्या टी-२० विश्वचषकानंतर राहुल द्रविड यांचा भारतीय मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला. टीम इंडियासोबतचा त्यांचा कार्यकाळ खूप संस्मरणीय होता. सध्या द्रविड हे सुट्टीवर असून ते सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्येही सामने पाहण्यासाठी द्रविड यांनी उपस्थिती लावली होती. पण सध्या द्रविड यांचा गोलंदाजी करतानाचा व्हीडिओ समोर आला आहे.
टीम इंडियापासून वेगळे झाल्यानंतर द्रविड सातत्याने चर्चेत आहेत. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो गोलंदाजी करताना दिसत आहे. फारच कमी वेळेस द्रविड यांना गोलंदाजी करताना चाहत्यांनी पाहिले आहे. राहुल द्रविड हे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या ग्राउंड स्टाफसोबत क्रिकेट खेळताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये राहुल द्रविड गोलंदाजी करत आहेत. व्हिडिओमध्ये खेळाडूंसोबतच प्रेक्षकांची गर्दीही पाहायला मिळते.
Rahul Dravid NCA स्टाफला करतायत गोलंदाजी, VIDEO व्हायरल
राहुल द्रविडनंतर गौतम गंभीर यांना भारतीय संघाचे नवे प्रशिक्षक बनवण्यात आले. गंभीरने आपल्या कार्यकाळाची सुरुवात श्रीलंका दौऱ्यापासून केली होती. आता टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आयपीएल २०२५ मध्ये एखाद्या संघाला प्रशिक्षण देताना दिसू शकतात, अशी चर्चाही सुरू होती. पुढील आयपीएलमध्ये कुमार संगकाराच्या जागी द्रविड राजस्थान रॉयल्सचा पुढील मुख्य प्रशिक्षक बनू शकतात. राहुल द्रविड नोव्हेंबर २०२१ ते जून २०२४ पर्यंत टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक होते. द्रविड यांच्या प्रशिक्षणाखाली भारताने २०२४ च्या टी२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले होते. टीम इंडियाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड कप जिंकला.
अलीकडेच राहुल द्रविड यांनी त्यांच्या कोचिंग कारकिर्दीतील सर्वात वाईट क्षण सांगितला होता. द्रविड म्हणाले की, जर तुम्ही मला विचाराल की सर्वात वाईट क्षण कोणता आहे, तर मी दक्षिण आफ्रिका मालिका मानतो. आम्ही दक्षिण आफ्रिकेत पहिली कसोटी जिंकली होती आणि आम्हाला अजून दोन कसोटी खेळायच्या होत्या. दक्षिण आफ्रिकेत आम्ही कधीही कसोटी मालिका जिंकलेली नाही. तिथे मालिका जिंकण्याची आमच्यासाठी चांगली संधी होती. आमचे काही सिनीयर खेळाडू त्या दौऱ्यावर संघाचा भाग नव्हते.
द्रविड म्हणाल की, आम्ही दोन्ही कसोटी सामने जिंकण्याच्या अगदी जवळ आलो होतो. आमच्याकडे मोठी संधी होती. आम्ही चांगले लक्ष्य देऊन सामना जिंकू शकलो असतो, पण दक्षिण आफ्रिकेने चांगली कामगिरी केली. त्यांनी चौथ्या डावात लक्ष्य गाठले. मला असे म्हणायचे आहे की मालिका जिंकण्याच्या जवळ येणे आणि त्यात अपयश येणे हा माझ्या कोचिंग करिअरमधील एक वाईट क्षण होता.