साधारण १९९४-९५ चा काळ असेल… क्रिकेट विश्वात तेव्हा लारा, सचिन, इंझमाम असे “स्फोटक” फलंदाज खेळत होते…. पण का कुणास ठाऊक मला तेव्हा रोशन महानामा, चंद्रपॉल, मांजरेकर ह्यांची बॅटिंग बघायला जास्त मजा यायची. त्याच काळात इंडियन बॅटिंग लाईनअप मध्ये जरा गडबड झाली होती. अक्खा सचिन आणि थोडासा अझर सोडून बाकी कोणीच फॉर्मात नव्हतं आणि आपली टीम निघाली होती इंग्लंडला…स्विंगिंग कंडिशन्स! टीम अनाउन्स झाली… त्यात दोन वेगळी नावं होती, पहिलं म्हणजे सौरव गांगुली आणि दुसरं म्हणजे राहुल द्रविड. गांगुलीबद्दल १९९२ मध्ये थोडंतरी ऐकल होतं …पण द्रविड???? कोण आहे हा?? वगैरे प्रश्न मला पडला. दुसऱ्या दिवशी सकाळमध्ये द्रविड हा एक संयमी खेळाडू असून तो पुढे मांजरेकरची जागा घेईल असा लिहून आलं… ते वाचून माझ्यातला “अनमच्युअर्ड” क्रिकेट फॅन जागा झाला..आणि मनात विचार आला की हा कर्नाटकचा नवीन पोरगा मांजरेकरला वगैरे काय घंटा रिप्लेस करणार? इंग्लंडमध्ये हा “एज्ड अँड गॉन” होईल.

थोड्याच दिवसांनी..साधारण मे महिन्यात आपली टीम इंग्लंडला गेली. सचिनने १०० मारुन सुद्धा आपण पहिली टेस्ट हरलो. एवढंच नाही तर पुढची प्रॅक्टिस मॅच पण हारलो. आता दुसरी टेस्ट होती, लॉर्ड्सवर सामना असल्यामुळे अपेक्षेप्रमाणे टीममध्ये खूप चेंजेस झाले. मांजरेकर आणि सुनील जोशीला बाहेर बसवून त्या ऐवजी गांगुली आणि द्रविडला टीममध्ये घेतलं. प्रॅक्टिस मॅचमध्ये द्रविडनी ० रन्स केल्यामुळे हा माणूस किती वेळ बॅटिंग करणार हा एक प्रश्न होता. आपली बॅटिंग सुरु झाली… नयन मोंगिया आउट झाला (हा हा…! हो त्या वेळी कोणी ही ओपन करायचं) आणि गांगुली मैदानात आला. आल्या-आल्या त्याने ऑफ साईड आपली करून टाकली. तो रुबाबदारपणे खेळत होता आणि दुसरीकडे आपली पाचवी विकेट पडली. थोड्याच वेळात लॉर्ड्सच्या उंच आणि ऐतिहासिक पॅव्हिलियन मधून बाहेर आला तो एक शांत, हुशार आणि संतासारखा दिसणारा खेळाडू, राहुल द्रविड! (ज्याच्याबद्दल फक्त वाचलं होतं, ज्याला मी उगाच शिव्या देत होतो अशा द्रविडला आज पहिल्यांदा पहिला होतं) थोड्याच वेळात गांगुली ने 100 मारले! तो आऊट झाल्यावर द्रविडनी टेल एन्डर्सना घेऊन जबरा बॅटिंग केली…. पण अचानक तो ९५ वर आऊट झाला आणि माझा चेहरा पडला! मॅचनंतर सगळीकडे गांगुलीबद्दल बरंच काही बोललं जाऊ लागलं. पुढच्या टेस्ट मध्ये सचिन, गांगुली नी १०० मारले..आणि द्रविड ८४ वर आऊट. सिरीज आपण १-० नी हरलो पण सगळीकडे चर्चा होती ती फक्त गांगुलीची. खूप टॅलेंटेड असलेला द्रविड पूर्णपणे झाकोळलेला होता. हीच गोष्ट कारणीभूत झाली द्रविडबद्दल सहानुभूती वाटायला. जेव्हा जेव्हा लोक गांगुलीचा कौतुक करायची तेव्हा मी जाणूनबुजून द्रविडचा विषय काढायला लागलो! Love at First Site सारखंच लव्ह इन फर्स्ट सिरीज झालं होतं मला!!!

राहुल इंग्लंडमध्ये छान खेळला होता. आता ९७-९८ मध्ये भारतात टेस्ट मॅच होत्या. पुढच्या ५-६ मॅचेसमध्ये तो १०० सोडा पण ५० सुद्धा एकदाच करू शकला. सुरवातीला आवडलेला हा माणूस “लांबी रेस का घोडा” वगैरे नाहीये की काय असं वाटायला लागलं ! पुढची टूर होती आफ्रिकेची. टेस्ट सिरीज सुरु झाली…पण हा पुन्हा फेल गेला. पहिल्या दोन्ही मॅचेसमध्ये फेल गेला…वाटला ही तिसरी टेस्ट ही त्याची शेवटची मॅच असेल. मॅच सुरु झाली, विक्रम राठोड नावाचा आपला ओपनर आउट झाला….आणि द्रविड मैदानात ! माझ्या पोटात गोळाच आला….तो भयंकर कॉन्सन्ट्रेशननी खेळत होता. दुसऱ्या बाजूनी मोंगिया, सचिन बाद झाले…..गांगुली आला..गेला. अझहर आऊट झाला, लक्ष्मण रिटायर्ड झाला…पण द्रविड शांतपणे दुसरया टोकाला उभा होता. कुंबळे बरोबर पार्टनरशिप करत तो ९० मध्ये पोचला होता आणि आमच्या पोटात गोळा आला होता आणि त्यानी शांत राहून पहिले वाहिले १०० मारले …ते ही आफ्रिकेमध्ये !!! मी जोरात ओरडलो…..”येस्स येस्स”! हीच एक सुरवात होती मी द्रविडला फॉलो करायला लागलो ह्याची. त्याच सामन्यात दुसऱ्या इनिंगला त्याने ८१ मारल्या. हा त्याचा सॉलिड परफॉर्मन्स बघून माझ्यातला “ओव्हर कॉन्फिडन्स” जागा झाला आणि द्रविड हा टफ कंडिशन्समध्ये सचिन-अझर पेक्षा भारी खेळतो वगैरे मी ओरडायला लागलो. खरं म्हणजे त्याला कारण पण तसंच होतं कारण नंतरच्या सिरीजमध्ये साहेबांनी खूप सातत्यपूर्ण खेळ केला. पुढची १-२ वर्ष अशीच छान गेली. आपला एक आऊट झाला कि द्रविड येतो….आणि मग आपण टीव्ही समोर एकटक मॅच बघत बसायचं….असं एक गणितच होऊन गेलं! द्रविडने ऑस्ट्रेलिया, झिम्बाव्वेच्या सिरीजमध्ये बऱ्याच ५० मारल्या पण १०० होत नव्हते, मात्र याचं अजिबात वाईट नाही वाटलं. त्याचा पीचवरचा प्रेझेन्सच हवाहवासा वाटायचा आणि अभ्यास-क्लास-शाळा बुडवायला भाग पडायचा! नंबर ३ म्हणजे द्रविड असा हळू हळू ठरुनच गेलं होतं.

मग आला न्यूझीलंड दौरा. भयानक पिचेस, भयानक बॉलर्स….द्रविड फॉर्मात असल्यामुळे मी निर्धास्त होतो पण अंदाज चुकला. द्रविड पहिली टेस्ट फेल गेला. शाळेत सगळे मित्र “काय तुझा माणूस आउट झाला, झेपत नाही त्याला” वगैरे म्हणून चिडवायला लागले. विशेष म्हणजे मला त्या गोष्टीचं वाईट नाही वाटलं, उलट मजा आली. कारण लोकं मला “द्रविड फॅन” म्हणून ओळखायला लागली होती. न्यूझीलंडच्या पुढच्या मॅचमध्ये द्रविडनी १९० आणि १२३ मारल्या मग लगेच शाळेत, बिल्डींग मध्ये सगळीकडे त्याचं कौतुक व्हायला लागलं. काही “दादा” लोकांच्या तोंडून ..द्रविडला मानलं बऱ का असा ऐकायला मिळाल्यावर एक वेगळाच आनंद झाला आणि एक्साइट झालो!

९९ च्या वर्ल्ड कपमध्ये दोन १०० मारल्या पण नेहमीप्रमाणे द्रविडपेक्षा गांगुली आणि सचिननी मारलेल्या १०० चं जास्त कौतुक झालं. या गोष्टीचा त्याला आणि मला अजिबात फरक नाही पडला, तो खेळत राहिला आणि मी त्याचा खेळ बघत राहिलो. ९९ वर्ल्ड कप मध्ये तो टॉप स्कोरर होता पण कुठे ही फारशी चर्चा झाली नाही! (१९९६ मध्ये सचिन टॉप स्कोरर होता तर त्याला “मॅन ऑफ द वर्ल्ड कप” मिळालं होतं!) ९९ नंतर मॅच फिक्सिंग नावाची गोष्ट बाहेर आली…त्या काळ्या घटनेनंतर ऑस्ट्रेलिया दौरा आणि पुढची १-२ वर्ष खूप खराब गेली. २००२ ला ऑस्ट्रेलिया भारतात आली, पहिली टेस्ट आपण हरलो…द्रविड पुन्हा अपयशी ठरला. दुसरी टेस्ट -एडन गार्डनवर फॉलोऑन नंतर १८० ची “मेमोरेबल इंनिंग” खेळला….आणि तो पुन्हा एकदा “आपला आधारस्तंभ” म्हणून ओळखू जाऊ लागला ! २००३ वर्ल्ड कपमध्ये आपल्याला अतिरिक्त फलंदाज खेळवता यावा म्हणून त्यांनी विकेटकिपींग केली. नंतर इंग्लंड दौऱ्यात टीमसाठी ओपननिंगसुद्धा केली….. तो खरा टीम प्लेयर होता! पण त्याच्यातला खरा माणूस दिसला तो अडलेड टेस्ट मध्ये…. ऐतिहासिक मॅच जिंकल्यावर त्यांनी सगळ्यात आधी इंडियन कॅपला किस केलं…आणि त्याच्या डोळ्यात पाणी होतं! ह्याच मॅचमध्ये त्याच्या २०० झाल्या तेव्हा मला घरी सकाळी ५ वाजता अभिनंदन करणारे कॉल्स आले.. मला खूपच मजा वाटत होती आणि तो अख्खा दिवस मी वेगळ्याच खुशीत होतो. नंतर त्याच्या करियरमध्ये खूप चढ उतार येऊन गेले पण तो एक मॅच्युअर्ड प्लेयर झाला होता आणि मी त्याचा मॅच्युअर्ड फॅन !!

मधली काही वर्ष फॉर्म गमावलेल्या राहुलने २०११ साली पुन्हा एकदा धडाक्यात पुनरागमन केलं. वर्षात तब्बल पाच शतकं ठोकून १३ हजार रन्स पूर्ण केल्या. दोन वर्ष शांत गेल्यावर २०११ ला वर्षभर मी दिवाळी साजरी केली! इंग्लंडमध्ये तर तो एकटाच चांगला खेळला… अर्थात त्यामुळे त्याच्या परफॉर्मन्स ‘ओव्हर शॅडो’ झाला नाही. द्रविडवर आंधळं प्रेम करणाऱ्या माझ्यासारख्याला मॅच हरल्याचं वाईट अजिबात नाही वाटलं. अनफॉर्च्युनेटली हा आनंद जास्त दिवस टिकला नाही. पुढच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याचा परफॉर्मन्स खूप गंडला. सर्वात वाईट होतं ते त्याची आऊट होण्याची पद्धत. साहेब ६-७ वेळा क्लीन बोल्ड झाले….तेव्हाच चाहूल लागली…आता सगळा संपतंय!

जुलैमध्ये पुन्हा एकदा टेस्ट मध्ये द्रविड आणि त्याचा पूल शॉट बघायला मिळेल…अशी अपेक्षा असताना द्रविडने अचानक रिटायरमेंट जाहीर केली!! १९९६ -२०१२ असं १६ वर्षांचं नातं संपलं. द्रविड बॅटिंगला आल्यावर पोटात येणार गोळा, तो खेळत असताना अभ्यास, काम सगळं सोडून टीव्ही किंवा क्रिकइन्फो.कॉम लावणं. तो ९० वर खेळत असताना अंधश्रद्धा ठेऊन एकाच खुर्चीवर बसून राहणं, तो लवकर आऊट झाल्यावर दिवसभर होणारा मूड ऑफ, त्याचे १०० झाल्यावर आलेले मेसेजेस, फोन कॉल्स, त्याला चुकीचं आऊट दिल्यावर दिल्यावर चिडून फेकून दिलेला टीव्हीचा रिमोट!! आता सगळं संपलय! आता राहिलीये ती फक्त चिन्नास्वामी स्टेडीयम वरची १३००० विटांची भिंत!!!

 

((विशेष सुचना – राहुल द्रविडने निवृत्ती घेतल्यानंतर लेखकाने हा लेख लिहीलेला आहे. राहुल द्रविडच्या वाढदिवसानिमीत्ताने आज हा लेख पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.))