Rahul Dravid should be given Bharat Ratna : भारताचे ज्येष्ठ फलंदाज सुनील गावसकर यांनी माजी खेळाडू आणि भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची मागणी केली आहे. द्रविडचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ टी-२० विश्वचषक फायनलनंतर संपला. टीम इंडियाला टी-२० विश्वचषक चॅम्पियन बनवण्यात राहुल द्रविडचा मोठा वाटा आहे. प्रशिक्षक म्हणून द्रविडच्या नेतृत्वाखाली अनेक स्पर्धेत टीम इंडियाने यश मिळवले आहे. ज्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि एकदिवसीय विश्वचषक २०२३ चे उपविजेते होण्याचा समावेश आहे. याशिवाय द्रविडच्या नेतृत्वाखाली संघाने आशिया कपचे विजेतेपदही पटकावले.
प्रशिक्षक असण्यासोबतच द्रविड यांनी भारतीय क्रिकेटमध्येही महत्त्वाचे योगदान दिले आहे. ते राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) प्रमुख होते आणि २०१८ मध्ये अंडर-१९ विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. एक खेळाडू म्हणून द्रविड यांनी २४१७७ धावा केल्या आहेत. द्रविड यांचा प्रभाव मैदानावर आणि मैदानाबाहेरही प्रचंड राहिला आहे.
सुनील गावसकर यांनी मिड डेसाठी लिहिलेल्या लेखात म्हटले आहे की, “भारत सरकारने राहुल द्रविड यांना भारतरत्न देऊन गौरव केला तर ते योग्य ठरेल. कारण त्यांची कामगिरी खरोखरच या गौरवासाठी पात्र आहे. एक महान खेळाडू आणि कर्णधार आहे, ज्याने वेस्ट इंडिजमध्ये मालिका जिंकली आणि इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकणारा तिसरा भारतीय कर्णधार ठरला. एनसीएचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी तरुण प्रतिभेला जोपासले आणि त्यानंतर ते वरिष्ठ भारतीय संघाचे प्रशिक्षक बनले.”
सुनील गावसकर पुढे म्हणाले, “वर्षाच्या सुरुवातीला समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या काही लोकांना भारतरत्न मिळाले होते. त्यांचे अत्यंत कट्टर समर्थकही मान्य करतील की त्यांचा प्रभाव मुख्यतः त्यांच्या पक्षापुरता आणि ज्या प्रदेशातून आले त्या भागापुरतेच मर्यादित होते. मात्र, राहुल द्रविड यांची कामगिरी अशी आहे की त्यामुळे संपूर्ण देशाला आनंद झाला आहे. देशाच्या सर्वोच्च सन्मानासाठी द्रविड नक्कीच पात्र आहेत. या देशाच्या महान सुपुत्राचा सरकारने सन्मान करावा या मागणीसाठी माझ्याबरोबर या. भारतरत्न राहुल शरद द्रविड, हे ऐकून छान वाटेल ना?”