राहुल द्रविड हा त्याच्या शांत स्वभावासाठी आणि उत्कृष्ट कोचिंगसाठी ओळखला जातो. कानपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीनंतर त्याने मोठे पाऊल उचलले. त्याच्या या निर्णयाला सर्वजण सलाम ठोकत आहेत. सामना संपल्यानंतर त्याने कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमच्या ग्राउंड्समनला ३५ हजार रुपये दिले. सामन्याच्या पाचही दिवशी खेळपट्टी चांगली राहिल्याने द्रविडने ग्राउंड्समनला ही रक्कम देत सर्वांची मने जिंकली.
सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी न्यूझीलंडच्या फलंदाजांनी ९४ षटके फलंदाजी केली आणि फक्त ८ विकेट गमावल्या. अशा प्रकारे दोन सामन्यांची मालिका सध्या ०-० अशा बरोबरीत आहे. अंतिम कसोटी ३ डिसेंबरपासून मुंबईत खेळवली जाणार आहे.
सामना संपल्यानंतर यूपी क्रिकेट असोसिएशनने (UPCA) याबाबत माहिती दिली. राहुल द्रविडने वैयक्तिकरित्या आमच्या ग्राउंड्समनला ३५ हजार रुपये दिले आहेत, असे त्यांनी सांगितले. या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी १९ विकेट घेतल्या दुसरीकडे, न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी १७ विकेट घेतल्या. या सामन्यात फलंदाज आणि गोलंदाज दोघांचे वर्चस्व होते. प्रशिक्षक म्हणून द्रविडची ही पहिलीच कसोटी मालिका आहे.
शेवटच्या दिवशी भारतीय संघाला सामना जिंकण्यासाठी ९ विकेट्सची गरज होती. भारताकडे आर अश्विन, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांच्या रूपाने फिरकी त्रिकूट होते. मात्र त्याला केवळ ८ विकेट घेता आल्या. मात्र, संघाने उशिराने डाव घोषित केल्याबद्दलही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चौथ्या दिवशी न्यूझीलंडला फलंदाजीसाठी फक्त ४ षटके मिळाली. पदार्पणात शतक ठोकणाऱ्या श्रेयस अय्यरला सामनावीर पुरस्कार मिळाला.
या मालिकेतील अंतिम सामना ३ डिसेंबरपासून होणार आहे. या सामन्यातून कर्णधार विराट कोहली पुनरागमन करत आहे. तो टी-२० मालिकेतही खेळला नव्हता. त्यामुळे संघाच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित आहे.