आयपीएल स्पॉट-फिक्सिंग आणि भ्रष्टाचार प्रकरण खेदजनक असून, खेळाची विश्वासार्हता टिकवण्याला सर्वोच्च प्राधान्य असायला हवे, असे मत भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने व्यक्त केले आहे.
‘‘या गोष्टींनी खेळाचे नुकसान होते. चुकीच्या कारणांसाठी वृत्तपत्रांमध्ये शेवटच्या पानांऐवजी पहिल्या पानावर येणे योग्य नाही,’’ असेही द्रविडने सांगितले. तो पुढे म्हणाला, ‘‘असंख्य चाहत्यांना क्रिकेटबद्दल आत्मीयता आहे. आम्ही क्रिकेटपटू म्हणून जे काही आहोत ते चाहत्यांमुळेच. खेळाडू आणि चाहते असल्यामुळेच क्रिकेट प्रशासक काम करू शकतात. त्यामुळे खेळ असो, मंडळ किंवा सरकार असो, त्याच्या विश्वासार्हतेचे संवर्धन करणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. सार्वजनिक जीवनात कार्यरत असताना कामकाजाइतकेच विश्वासार्हता कळीचा मुद्दा आहे,’’ याचा द्रविडने पुनरुच्चार केला.