Rahul Dravid embarrassing: टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि सध्याचा प्रशिक्षक राहुल द्रविडची प्रतिमा अतिशय सभ्य, साधी आणि हुशार व्यक्ती अशी आहे. क्रिकेटच्या मैदानावर किंवा सार्वजनिक जीवनात तो क्वचितच रागावलेला दिसतो. आपल्या शांत आणि विनम्र वागण्याने समोरच्याच्या हृदयावर आणि मनावर सुंदर छाप सोडणारे असे सभ्य व्यक्तिमत्व बहुतेकांना आवडते. पण हा राहुल काही वर्षांपूर्वी एका जाहिरातीत स्वत:ला ‘इंदिरा नगर का गुंडा’ म्हणत आणि बॅटने एका कारची खिडकी तोडताना दिसल्याने त्याच्या चाहत्यांनाही धक्का बसला होता. यावर राहुल द्रविडने सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात राहुलने या जाहिरातीशी संबंधित गोष्टी शेअर केल्या. तो म्हणाला, “माझ्याकडे आता वेगळ्या नजरेने पाहणारे लोक आहेत. या व्यक्तीचा स्फोट कधीही होऊ शकतो हे पाहून त्यांना आश्चर्य वाटते. हा खरोखर चांगला आणि सकारात्मक प्रतिसाद आहे. मला मिळालेल्या प्रतिक्रियांबद्दल मला खात्री नव्हती पण मला वाटते की ती खरोखरच चांगली घेतली गेली आहे. माझ्या आईशिवाय सर्वांसाठी ती सकारात्मक आहे परंतु तिला अद्याप याबद्दल खात्री नाही. माझ्या मते मी गाडीची काच फोडली नसावी असे तिला अजूनही वाटते.”
द्रविड पुढे म्हणाला, ‘मुंबईच्या रस्त्यांसमोर उभं राहून कदाचित मी केलेल्या सर्वात लाजिरवाण्या गोष्टींपैकी ही एक आहे. जरी हे एक जाहिरात शूट आहे, परंतु तुम्हाला माहित आहे की तुमच्या आजूबाजूला असे लोक आहेत जे यावरून कधी ना कधी मला ट्रोल करणार किंवा काहीतरी बोलणार. असे असूनही रस्त्याच्या मधोमध उभं राहून आरडाओरडा करणं माझ्यासारख्या माणसासाठी खरंच लाजिरवाणं होतं. माझ्या आईचेही असेच मत आहे. ती मला या जाहिरातीनंतर काही दिवसांनी म्हणाली की, ‘माझ्यासाठी ही न शोभणारी अशी लाजिरवाणी गोष्ट आहे. पण तू हे केलं असशील असा मला अजूनही विश्वास वाटत नाही.’ यावर मी म्हणालो की ती फक्त जाहिरात आहे.”
माहितीसाठी की, विराट कोहलीनेही दोन वर्षांपूर्वी आलेल्या या जाहिरातीचा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला होता. त्यांनी मजेशीर कमेंट केली. तो म्हणाला होता की, “राहुल भाईची अशीही एक बाजू कधीच पाहिली नाही.” सध्या राहुल द्रविड टीम इंडियासोबत वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे, जिथे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. पहिला सामना डॉमिनिका येथे खेळला जात आहे.