भारतीय संघात कायम उत्तमोत्तम खेळाडूंचा भरणा असतो. अनेकदा सध्याचा संघ चांगला की आधीचा संघ चांगला? यावर चर्चा रंगते. तसेच एखाद्या पिढीत कोण श्रेष्ठ यावरही वाद-विवाद रंगतो. कोहली श्रेष्ठ की रोहित, हा जसा सध्याच्या पिढीतील चर्चेचा विषय असतो. तसाच काहीसा विषय या आधीच्या संघांमधील खेळाडूंच्या बाबतीतही होता. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण, राहुल द्रविड अशा दिग्गज खेळाडूंच्या बाबतीत ही चर्चा अनेकदा रंगलेली क्रिकेटप्रेमींना आठवत असेल. पण माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने एक असा पराक्रम करून ठेवला आहे, जो भारताच्याच नव्हे, तर जगातील कोणत्याही फलंदाजाला करता आलेला नाही.
राहुल द्रविड हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडू खेळलेला खेळाडू आहे. राहुल द्रविड कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल ३१ हजार २५८ चेंडू खेळले आहेत. ३० हजारांहून अधिक चेंडू खेळलेला राहुल द्रविड हा एकमेव खेळाडू आहे. BCCIने राहुल द्रविडचा एक फोटो ट्विट केला आहे.
#DidYouKnow Rahul Dravid is the only cricketer till date to have faced more than 30,000 (31,258) deliveries in Test cricket pic.twitter.com/HDO1uJLi3z
— BCCI (@BCCI) November 17, 2018
द्रविडने हा पराक्रम १६४ सामन्यांमध्ये आणि २८६ डावांमध्ये केला आहे. १९९६ ते २०१२ या कालावधीत त्याने एकूण १३ हजार २८८ धावा केल्या. त्यात २७० या त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली. कसोटी कारकिर्दीत त्याने ३६ शतके आणि ६३ अर्धशतके ठोकली आहेत.