गुरुवारी झालेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने विजय मिळवला असला, तरी पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध झालेला सामना गमावल्याने भारताचा आशिया चषकातील प्रवास संपला आहे. दरम्यान, आशिया चषकातील या खराब प्रदर्शनानंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने प्रतिक्रिया दिली. ”आम्ही दोन सामने हरलो म्हणून आम्ही खराब संघ ठरत नाही”, असे तो म्हणाला.
हेही वाचा- विजयापेक्षा विराटचे शतक मोठे! अफगाणिस्तानचा लाजिरवाणा पराभव, कोहलीच्या फलंदाजीमुळे भारतीय सुखावले
काय म्हणाला राहुल द्रविड?
”टी-२० सामन्यांमध्ये जिंकण्यासाठी मार्जिन कमी असते. पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्धचे दोन्ही सामने जिंकणे सोप्पे नव्हते. हे सामने शेवटच्या षटकापर्यंत पोहोचले. आम्ही या पराभवातून बरच काही शिकलो आहे. दोन सामने आम्ही हरलो, म्हणून त्यावर ओव्हर रिअॅक्ट होण्याची गरज नाही. त्यामुळे आमचा संघ खराब आहे, असं होत नाही. गेल्या आठ ते नऊ महिन्यात आम्ही चांगले क्रिकेट खेळलो आहे”, असे तो म्हणाला.
हेही वाचा – अमित मिश्राचे पाकिस्तानी अभिनेत्रीच्या ट्वीटला चोख प्रत्युत्तर; म्हणाला, “माझा पाकिस्तानात…”
दरम्यान, २०१६ आणि २०१८ या दोन्ही वर्षी भारताने आशिया चषक स्पर्धा जिंकली होती. त्यामुळे यावेळी भारतीय संघाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, भारताला यंदा विजेतेपद राखता आले नाही. सुपर ४ च्या दोन सामन्यांमध्ये पराभव झाल्यानंतर भारताला स्पर्धेतून बाहेर जावे लागले.