Rahul Dravid Coach: भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविडचे चांगले प्रशिक्षण पाहून बीसीसीआयने त्याचा कार्यकाळ वाढवला आहे. द्रविडच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अनेक मोठ्या मालिका जिंकल्या आहेत. त्यामुळे बीसीसीआयने पुन्हा त्याच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये त्याने टीम इंडियाची जबाबदारी स्वीकारल्यापासून, टीम आतापर्यंत चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मात्र, त्याचा वाढीव कार्यकाळ किती वर्षाचा असणार याबाबत बीसीसीआयने अधिकृतपणे माहिती दिलेली नाही.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृतानुसार, त्याचा कार्यकाळ हा टी-२० विश्वचषक किंवा पुढील एका वर्षापर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र ,याबद्दल बीसीसीआयने कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना जूनमध्ये कॅरिबियन आणि अमेरिकेत होणारा टी-२० विश्वचषक संपेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती, असा इंडियन एक्सप्रेसने अंदाज व्यक्त केला आहे.
हेही वाचा: IND vs SA: पुजारा-रहाणे यांना कसोटी संघात स्थान मिळेल की BCCI नव्या चेहऱ्याला संधी देईल? जाणून घ्या
बीसीसीआयने भारताचा माजी डावखुरा वेगवान गोलंदाज आशिष नेहरा याला सर्वात लहान फॉरमॅट म्हणजेच टी-२०मध्ये प्रशिक्षकपदाचा प्रस्ताव दिला होता, परंतु जेव्हा त्याने नकार दिला. त्यानंतर बोर्डाने द्रविडची सर्व फॉरमॅटमध्ये प्रशिक्षक म्हणून पुन्हा नियुक्ती केली.
वरिष्ठ भारतीय संघात प्रशिक्षकपदाची भूमिका बजावण्यापूर्वी, द्रविडने २०१८मध्ये अंडर-१९ संघाचे नेतृत्व केले होते. २०१६ साली त्याच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला होता. त्याने आयपीएल फ्रँचायझी दिल्ली आणि राजस्थानचे प्रशिक्षकपदही भूषवले आहे. इतकेच नाही तर त्यांनी दीर्घकाळ एनसीए म्हणजेच राष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे देखील नेतृत्व केले आहे. त्यानंतर राहुल द्रविडने १० टी-२० मालिका, नऊ एकदिवसीय आणि पाच कसोटी मालिकांमध्ये टीम इंडियाचे प्रशिक्षकपद भूषवले आहे. द्रविडचा हा अनुभव लक्षात घेऊन बीसीसीआयने पुन्हा त्याचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ वाढवला.
द्रविडने अनेक मालिकांमध्ये भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषवलेले नाही. या काळात त्याच्या अनुपस्थितीत व्हीव्हीएस लक्ष्मणने ही जबाबदारी चोख पार पाडली. गेल्या वर्षी झिम्बाब्वे एकदिवसीय मालिकेदरम्यान भारताने ३-०ने जिंकल्यानंतर द्रविडला ब्रेक देण्यात आला होता. पुन्हा एकदा त्याला टी-२० आंतरराष्ट्रीय विश्वचषकानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली. किवींनी एकदिवसीय मालिका १-० अशी जिंकली, तर भारताने टी-२० मालिका १-०ने जिंकली होती. मायदेशातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही लक्ष्मणने जबाबदारी सांभाळली होती. त्यात भारताने ३-०ने निर्भेळ यश संपादन केले होते.