Rahul Dravid says South Africa tour is very tough : माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आपल्या कार्यकाळात टीम इंडियाला टी-२० विश्वचषक २०२४ चे विजेतेपद मिळवून दिले. या स्पर्धेनंतर त्यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला. राहुल द्रविड यांच्या कार्यकाळात टीम इंडिया तीन वेळा आयसीसी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. त्यापैकी दोनमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आणि एकात विजय मिळवता आला. एकदिवसीय विश्वचषक आणि टेस्ट चॅम्पियनशीप २०२३ मध्ये भारताला पराभव पत्करावा लागला. आता टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सांगितले की, त्यांच्या कार्यकाळातील सर्वात वाईट टप्पा कोणता होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राहुल द्रविड यांनी २०२१ मध्ये कोचिंगची जबाबदारी स्वीकारली होती –

राहुल द्रविड यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये टीम इंडियाच्या कोचिंगची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांचा पहिला परदेश दौरा अशा देशाचा होता जिथे भारताने कधीही कसोटी मालिका जिंकली नव्हती. भारतीय संघाचा प्रशिक्षक असताना त्याच्यासाठी सर्वात कठीण काळ कोणता होता, असे द्रविडला विचारण्यात आले तेव्हा त्याने आपल्या पहिल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याबद्दल सांगितले.

राहुल द्रविड यांनी स्टार स्पोर्ट्सला सांगितले की, ‘दक्षिण आफ्रिका दौरा आमच्यासाठी खूप कठीण दौरा होता. सेंच्युरियनमध्ये त्या दौऱ्यातील पहिली कसोटी आम्ही जिंकली. दक्षिण आफ्रिकेत आम्ही कधीही कसोटी मालिका जिंकलेली नाही हे आम्हा सर्वांना माहीत आहे. ही आमच्यासाठी मोठी संधी होती. मात्र, एक गोष्ट अशी होती की, त्यावेळी आमच्या संघात अनेक वरिष्ठ खेळाडू उपस्थित नव्हते. त्यानंतर रोहित शर्मा दुखापतीमुळे संघाबाहेर पडला होता. इतर काही वरिष्ठ खेळाडूही संघात नव्हते.’

हेही वाचा – Vinesh Phogat Case : विनेश फोगटच्या पदकासंदर्भात सुनावणी पूर्ण, पदक मिळणार की नाही याचा फैसला ‘या’ दिवशी होणार

राहुल द्रविड यांनी सांगितला कार्यकाळातील सर्वात वाईट टप्पा –

राहुल द्रविड पुढे म्हणाले, ‘उर्वरित दोन कसोटी सामन्यात आम्ही विजयाचा अगदी जवळ होतो. दोन्ही कसोटी सामन्यांच्या तिसऱ्या डावात आम्हाला विजयाची मोठी संधी होती. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या संघाने त्यावेळी खूपच चांगला खेळ दाखवला आणि चौथ्या डावात त्यांनी चांगला पाठलाग केला. भारतीय संघाचा प्रशिक्षक असताना हे माझ्यासाठी सर्वात कठीण दिवस होते, असे मी म्हणेन.’

‘खेळाबद्दल खूप काही शिकलो’ – राहुल द्रविड

राहुल द्रविड म्हणाले, ‘मला तिथून खूप काही शिकायला मिळाले. तिथे आम्हाला आमच्या खेळाबद्दल आणि आम्हाला काय काम करण्याची गरज आहे. याबद्दल बरेच काही शिकायला मिळाले. एकंदरीत, असे म्हणता येईल की प्रशिक्षक म्हणून तुम्हाला नेहमीच एकसारखे दिवस पाहायला मिळणार नाहीत. कारण चढ-उतार येत राहतात. त्यामुळे आपण नेहमी जिंकणार नाही हे समजून घेणे आवश्यक आहे. बाकीचे संघही खेळायला आले आहेत आणि तुमचा सामना जागतिक दर्जाच्या संघांशी होत आहे, हे विसरता कामा नये.

हेही वाचा – What is CAS : विनेश फोगट अपात्र प्रकरणावर निर्णय देणारे CAS नेमकं काय आहे? जाणून घ्या

जय-पराजयाचा समतोल समजून घ्यावा लागतो –

राहुल द्रविड म्हणाले, ‘तुम्हाला जय-पराजयाचा समतोल समजून घ्यावा लागेल. तुमच्याकडे नेहमी जिंकण्याचा पर्याय नसतो, परंतु तुमच्याकडे नेहमी चांगली तयारी करण्याचा पर्याय नक्कीच असतो. तुमच्याकडे योग्य संघ निवडण्याचा पर्याय देखील आहे, परंतु या सर्व गोष्टी असूनही तुम्ही पराभूत होऊ शकता आणि तुम्हाला ते संतुलन समजून घ्यावे लागेल.’ द्रविड यांना असेही विचारण्यात आले की भारतीय संघातील सर्व वरिष्ठ आणि सुपरस्टार खेळाडूंना एकत्र करण्यात ते कसे यशस्वी ठरले? यावर ते म्हणाले की याचे संपूर्ण श्रेय तो घेऊ शकत नाही आणि याचे बरेच श्रेय रोहित शर्मालाही जाते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul dravid says team indias south africa tour is very tough as head coach of indian team tenure vbm