युवा विश्वचषक (१९ वर्षांखालील) क्रिकेट स्पध्रेकरिता न्यूझीलंडला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाचे प्रशिक्षक आणि माजी कसोटीपटू राहुल द्रविड यांनी भारतीय युवा संघाच्या कामगिरीवर विश्वास व्यक्त केला आहे. आगामी सहा ते आठ महिन्यांच्या काळात  या युवा संघातील खेळाडूंना भारताच्या ‘अ’ संघाकडून खेळताना पाहण्याचे लक्ष्य द्रविडने डोळ्यासमोर ठेवले आहे.

‘युवा विश्वचषक स्पध्रेत रोमांचक आव्हान असतात आणि या खेळाडूंसाठी ही चांगली संधी आहे. भारताच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे. युवा क्रिकेटपासून सुरू होणारा हा प्रवास संधी मिळत गेल्यानंतर प्रथम श्रेणी, भारत ‘अ’ आणि त्यानंतर राष्ट्रीय संघ असा त्याचा प्रवास होत असतो,’ असे द्रविड यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की,‘युवा खेळाडूंसोबत मी क्रिकेटच्या इतर प्रकाराबद्दलही चर्चा करतो. पुढील ६ ते ८ महिन्यांत या खेळाडूंनी भारताच्या ‘अ’ संघात स्थान मिळवल्यास, आनंदच होईल. युवा विश्वचषक स्पध्रेतून खेळाडू घडायला सुरूवात होते.

मुंबईचा खेळाडू पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ युवा विश्वचषक स्पध्रेत खेळणार आहे. पृथ्वीने यापूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यात भारत ‘अ’ संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यामुळे या युवा संघातून भारताच्या वरिष्ठ संघात स्थान मिळवण्यात कोणते खेळाडू आघाडीवर आहेत, याबाबत द्रविडला विचारले असता तो म्हणाला,‘युवा आणि भारत ‘अ’ संघाचा प्रशिक्षक म्हणून या खेळाडूंकडून मला बरेच काही शिकायला मिळाले. या पिढीचा विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. त्यांना क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांशी जुळवून घ्यायचे आहे. हे खूप मोठे आव्हान आहे. हा खेळ बराच बदलला आहे. त्यामुळे वरिष्ठ संघात यापैकी कोण खेळेल याबाबत मी सांगू शकत नाही. प्रत्येक खेळाडूमध्ये क्षमता आहे.’

 

Story img Loader