राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि विराट कोहली यांच्यातील एक सारखी गोष्ट विचारली तर, तिघेही भारतीय संघाचे कर्णधार होते, असे उत्तर पटकन मिळेल. मात्र, या व्यतिरिक्त आणखी एक गोष्ट अशी आहे जी या तिघांच्याबाबतीत सारखीच आहे. ती म्हणजे त्यांच्या कसोटी पदार्पणाचा दिवस! या तिन्ही दिग्गज भारतीय फलंदाजांनी २० जून या दिवशी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. सौरव गांगुली आणि राहुल द्रविडने २० जून १९९६ रोजी तर विराट कोहलीने २० जून २०११ रोजी आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती.
प्रचंड आक्रमक सौरव गांगुली आणि तितकाच शांत राहुल द्रविड यांनी १९९६मध्ये क्रिकेटच्या पंढरीत एकाच सामन्यात कसोटी पदार्पण केले होते. २० जून १९९६ रोजी लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील दुसरी कसोटी खेळवण्यात आली होती. कसोटीच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करताना २३ वर्षांच्या द्रविड आणि गांगुलीने सहाव्या गड्यासाठी ९४ धावांची भागीदारी केली होती. या पदार्पणवीरांच्या कामगिरीमुळे भारतीय संघ अडचणीतून बाहेर निघाला होता.
गांगुलीने आपल्या पहिल्याच कसोटीमध्ये २० चौकारांसह १३१ धावा करत पहिले कसोटी शतक पूर्ण केले. द्रविडचे शतक मात्र, अवघ्या पाच धावांनी हुकले. त्याने १६७ चेंडूत ९५ धावा केल्या होत्या. दोघांनी मोठ्या खेळी करून आपली कारकीर्दीची चुणूक त्यावेळी दाखवली होती.
सौरव आणि राहुलच्या तुलनेत, कोहलीची किंग्स्टनमधील सुरुवात काहीशी वाईट ठरली. आपल्या पहिल्याच कसोटीतील दोन्ही डावांत तो फिडेल एडवर्ड्सच्या गोलंदाजीवर स्वस्तात झेलबाद झाला. त्याने चार आणि १५ धावा केल्या होत्या. कोहलीची सुरुवात जरी चांगली झाली नसली तरी नंतरच्या त्याच्या पराक्रमांनी कसोटी क्रिकेटमध्ये त्याला असामान्य स्थान मिळवून दिले.
हेही वाचा – युवराज सिंगच्या ‘पुत्तर’चं नाव ऐकलंत का? फादर्स डेच्या दिवशी केला खुलासा
काळाच्या गरज ओळखून राहुल द्रविड आणि सौरव गांगुलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र, भारतीय क्रिकेटमधील हे त्रिकूट अजूनही एकमेकांशी जोडले गेलेले आहे. कोहली सध्या भारतीय संघाचा महत्त्वाचा भाग बनलेला आहे तर प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड त्याला मार्गदर्शन करत आहे. भारतीय क्रिकेट मंडळाचा प्रमुख म्हणून गांगुली त्यांना प्रशासकीय मदत पुरवत आहे.