भारताचा दिग्गज आणि माजी कर्णधार राहुल द्रविड श्रीलंका दौर्‍यावर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक असणार आहे. बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने ही माहिती दिली. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, श्रीलंकेत होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी द्रविडची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचवेळी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या तयारीत व्यस्त असेल. द्रविड गेली अनेक वर्षे १९ वर्षांखालील भारतीय संघ आणि इंडिया ‘अ’ संघाला प्रशिक्षण देत आहे.

राहुल द्रवि़डने १९९६मध्ये श्रीलंकेविरुद्धच एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, आता तो श्रीलंकेविरुद्धच टीम इंडियासाठी मुख्य प्रशिक्षकाची भूमिका साकारणार आहे. शिखर धवनच्या नेतृत्वात तीन एकदिवसीय मालिका आणि तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडिया या महिन्याच्या शेवटी श्रीलंका दौर्‍यावर रवाना होईल. त्यासाठी भारतीय खेळाडूंनी मुंबई गाठली आहे. या दौऱ्यापूर्वी खेळाडूंना १४ दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीत राहावे लागेल.

 

 

हेही वाचा – WTC Final : भारताविरुद्धच्या लढाईसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा

भारत आणि श्रीलंका यांच्यात १३ ते २५ जुलै दरम्यान तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळली जाईल. कोलंबच्या आर. प्रेमादास आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर या दोन्ही मालिकेचे सर्व सहा सामने खेळले जातील.

भारतीय संघ :

शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंडय़ा, नितीश राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), यजुर्वेद्र चहल, राहुल चहर, के. गौतम, कृणाल पंडय़ा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन सकारिया.